मुलुंडमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावल्याचा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:26 PM2019-04-29T13:26:31+5:302019-04-29T13:29:22+5:30
होली एन्जल स्कूल येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ उडाल्याची घटना घडली.
मुंबई : मुंबईतील सहा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघातील मुलुंड पूर्वेकडील भागात असलेल्या होली एन्जल स्कूल येथील मतदान केंद्रात आज सकाळी काही काळ गोंधळ उडाल्याची घटना घडली.
होली एन्जल स्कूल मतदान केंद्रातील ईव्हीएमवर भाजपाच्या चिन्हासमोर शाई लावण्यात आल्याचा प्रकार मतदाराच्या निदर्शनास आला. यानंतर मतदारांनी शंका उपस्थित करत मतदान केंद्रावर गोंधळ घातला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी ईव्हीएम बदलण्याची मागणी केली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर दुसरे ईव्हीएम लावण्यात आले आणि मतदान पूर्ववत सुरु झाले. दरम्यान, या गोंधळामुळे या मतदान केंद्रावरील मतदानाची प्रक्रिया तासभर बंद होती.
ईशान्य मुंबईत भाजपाने विद्यमान खासदार किरीट सोमय्यांना डावलून मनोज कोटक यांना तिकीट दिले आहे. या मतदार संघात मनोज कोटक विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत भाजपा आपली जागा राखतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014 साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या.