प्रदूषित वायू ठरतोय जीवघेणा; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 05:31 AM2018-10-30T05:31:45+5:302018-10-30T06:25:47+5:30

९० टक्के मुलांच्या शरीरात श्वसनाद्वारे विषारी वायूचा शिरकाव

Polluted gas leads to fatality; World Health Organization Report | प्रदूषित वायू ठरतोय जीवघेणा; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

प्रदूषित वायू ठरतोय जीवघेणा; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

googlenewsNext

- स्नेहा मोरे

मुंबई : दिवसागणिक वाढणाऱ्या वायुप्रदूषणामुळे जगातील १५ वर्षांखालील ९३ टक्के लहान मुलांच्या शरीरात श्वसनाद्वारे विषारी वायू जात आहेत. याचा गंभीर परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६च्या अहवालानुसार, वातावरणातील वाढत्या वायुप्रदूषणामुळे श्वसनप्रक्रियेवर परिणाम होऊन सहा लाख लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे वायुप्रदूषणाची समस्या ही आता वैश्विक पातळीवरील गंभीर धोका असल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘वायुप्रदूषण आणि बालकांचे आरोग्य’ या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

अहवालानुसार, जगातील १८० कोटी लहान मुलांचा जीव विषारी वायूच्या श्वसनामुळे धोक्यात आला आहे. वातावरणातील वायुप्रदूषण आणि घरातील वायुप्रदूषण या दोन्ही घटकांचा लहानग्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. विशेषत: कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशात ही समस्या दिसून येत आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे, या वायुप्रदूषणाचा गर्भवतींच्या आरोग्यावरदेखील गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे मुदतीपूर्व प्रसूतींचे प्रमाण वाढले आहे. त्या कमी वजनाच्या बालकांना जन्म देत आहेत.

पर्यावरणात असमतोल असल्याने वायुप्रदूषण वाढत आहे. परिणामी, लहान वयातच दम्याचा आणि कर्करोगासारखा गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रमाणेच, ज्या लहान मुलांना वायुप्रदूषणाच्या उच्च पातळीवर सामोरे जावे लागले असेल त्यांच्या जीवाला भविष्यात हृदयविकाराच्या आजारांसारख्या दीर्घकालीन अशा विविध आजारांमुळे जास्त धोका असू शकतो, असे स्पष्ट झाले आहे.

प्रदूषित वायुमुळे बालके अशक्त होतात
प्रदूषित वायू लाखो मुलांना विषबाधा करून त्यांचा जीव धोक्यात आणत आहे. प्रत्येक बालकाने स्वच्छ हवा श्वास घेण्यास सक्षम असावे, जेणेकरून त्यांची शारीरिक व मानसिक वाढ होऊ शकेल आणि त्यांची संपूर्ण क्षमता पूर्ण करू शकतील. वायुप्रदूषणाच्या प्रभावामुळे विशेषत: बालके अशक्त होतात. कारण प्रौढांपेक्षा ते वेगाने श्वास घेतात आणि त्यामुळे अधिक प्रदूषण शोषतात. ही बालके जमिनीच्या कायम जवळ असतात. मात्र, त्याच वेळेस प्रदूषित वायू शरीरास अपायकारक ठरतात.
- डॉ. विनय सरनोबत, श्वसनविकारतज्ज्ञ

Web Title: Polluted gas leads to fatality; World Health Organization Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.