मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात घट झाली आहे. हे तापमान १५ अंशाखाली उतरले आहे. अहमदनगर १३.३ आणि पुणे येथे १३.७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. किमान तापमान खाली घसरण्याचा कल आणखी काही दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे मुंबईचे किमान तापमानदेखील २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, बुधवारी सकाळी नोंदविण्यात आलेले ढगाळ हवामान गुरुवारसह शुक्रवारीही कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.बुधवारी सकाळी मुंबईत किंचित गार वारा वाहत होता. सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईच्या उपनगरात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण होते. १० नंतर मात्र यात बदल झाला. दुपारी पडलेल्या रखरखीत उन्हाने मुंबईकरांना चटके दिले. गुरुवारसह शुक्रवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०, २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.विदर्भाला पावसाचा इशारा५ आणि ६ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.७ आणि ८ मार्च : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.
प्रदूषित मुंबई ढगाळ हवामानाने वेढली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:46 AM