कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानेही मुंबईला वेढले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 07:13 AM2020-01-20T07:13:56+5:302020-01-20T07:14:10+5:30
अवघ्या १५ अंश किमान तापमानाखाली रविवारी भल्या पहाटे मुंबईची मॅरेथॉन धावली असतानाच दुसरीकडे मात्र रविवारी बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पुन्हा एकदा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे.
मुंबई : अवघ्या १५ अंश किमान तापमानाखाली रविवारी भल्या पहाटे मुंबईची मॅरेथॉन धावली असतानाच दुसरीकडे मात्र रविवारी बोरीवली, मालाड, बीकेसी, वरळी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवेचा दर्जा पुन्हा एकदा अत्यंत वाईट नोंदविण्यात आला आहे. एकंदर आजच्या रविवारी कडाक्याच्या थंडीसह प्रदूषणानेही मुंबईला वेढल्याचे चित्र असतानाच आता हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आता राज्यभरात किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून, २६ ते २८ जानेवारीदरम्यान पुन्हा एकदा राज्यभरात कडाक्याची थंडी जाणवेल.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ११ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. २१ जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. २० आणि २१ जानेवारी रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१ आणि १५ अंशाच्या आसपास राहील. पुढील काही दिवस हे वातावरण असेच कायम राहणार आहे.
राज्यातील शहरांचे तापमान
मुंबई १५.८
पुणे १२.७
जळगाव ११.२
महाबळेश्वर १५
मालेगाव १२
नाशिक ११
सातारा १४.३
उस्मानाबाद १३.४
औरंगाबाद १२.६
परभणी १५
नांदेड १५
अकोला १४
अमरावती १५.८
बुलडाणा १३.६
गोंदिया १५.५
नागपूर १५.३
हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण पार्टिक्युलेट मॅटरमध्ये
बोरीवली २३२ वाईट
मालाड २१४ वाईट
बीकेसी ३२४ अत्यंत वाईट
वरळी २४४ वाईट
चेंबूर २०९ वाईट
माझगाव २६१ वाईट
नवी मुंबई २६९ वाईट