Join us

किती प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली, पुनर्प्रक्रिया केली? नोंदणी करा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 11:06 AM

अन्यथा उद्योगधंद्यांना लागणार ‘टाळे’.

मुंबई : प्लास्टिकचे किती उत्पादन केले, बाजारपेठेत किती प्लास्टिक दिले. याशिवाय प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने किती विल्हेवाट लावली, पुनर्प्रक्रिया किती केली? या सर्वांचा हिशेब आता प्लास्टिक पॅकेजिंगचे उत्पादक, आयातदार, ब्रँडमालक, प्लास्टिक कचरा पुनर्प्रक्रिया उद्योगधंदे करणाऱ्यांना द्यावा लागणार आहे. या उद्योगांना केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पोर्टलवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करून उत्पादन केल्यास नुकसानभरपाईसह उद्योगधंदे बंद केले जातील, असा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.  

प्रदूषणाने केला कहर, सरकारकडून कठोर पावले -

१) राज्यभरात प्लास्टिक प्रदूषणाने कहर केला आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्रीय आणि राज्यस्तरावर कठोर पावले उचलली जात आहेत. 

२) यापूर्वी किती प्लास्टिकची निर्मिती झाली, किती प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया झाली किंवा यासंबंधी काम करणारे किती उद्योग आहेत? याचा हिशेब लागत नव्हता. त्यामुळे आता या सगळ्याचे ऑडिटच करण्याचे ठरविले आहे.

३) त्यानुसार प्लास्टिक पॅकेजिंगचे उत्पादक, आयातदार, ब्रँडमालक आणि प्लास्टिक कचरा पुनर्प्रक्रिया उद्योग यांना केंद्राच्या ईपीआर या पोर्टलवर आपली नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

४) याकरिताची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत.

उत्पादक, आयातदार, ब्रँडमालक  दोनपेक्षा जास्त राज्य, केंद्रशासित प्रदेशांत  कार्यरत असल्यास त्यांना केंद्राकडे तर एक किंवा दोन राज्यात कार्यरत असल्यास त्यांना राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीमुळे प्लास्टिकचे किती उद्योग आहेत, बाजारात किती प्लास्टिक आले आणि त्याच्यावर पुनर्प्रक्रिया होते आहे की नाही? याची माहिती मिळणे सोपे होणार आहे. विशेषत: प्लास्टिकची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे सोपे होणार आहे.

टॅग्स :मुंबईराज्य सरकारप्रदूषण