खाडीतील प्रदूषण वाढले
By admin | Published: September 23, 2014 02:08 AM2014-09-23T02:08:12+5:302014-09-23T02:08:12+5:30
शहराला २२ किलोमीटरचा समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. परंतु वर्षानुवर्षे खाडीतील प्रदूषण वाढत आहे.
नामदेव मोरे, नवी मुंबई
शहराला २२ किलोमीटरचा समृद्ध खाडीकिनारा लाभला आहे. परंतु वर्षानुवर्षे खाडीतील प्रदूषण वाढत आहे. क्लोराइड नियोजित प्रमाणापेक्षा तब्बल २० पट जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रदूषणामुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, पर्यावरणावरील ताण वाढत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एका बाजूला दिघा ते बेलापूरपर्यंत डोंगररांगा आहेत, तर दुसऱ्या बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत खाडीकिनारा लाभला आहे. आजही दिवा, घणसोली, वाशी, सारसोळे, करावे, दिवाळे गावातील हजारो कोळी कुटुंबे मासेमारी करून उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु या सर्वांसाठी धोक्याची घंटा खणखणू लागली आहे. खाडीला प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे महापालिकेच्या अहवालामधून निदर्शनास आले आहे. पालिकेच्यावतीने ६ ठिकाणी खाडीच्या पाण्याची तपासणी केली जाते. या तपासणीवरून खाडीतील पाण्यातील सीओडी व बीओडीची मात्रा सर्वाधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. बेलापूर व सानपाडामध्ये सीओडीची मात्रा विहिरीतील पाण्यापेक्षा तिप्पट असल्याचे निदर्शनास आले आहे.