मुंबई : मुंबईत बीकेसी, चेंबर, कुर्ला यांसारख्या परिसरांनी प्रदूषणाची कमाल पातळी गाठली आहे. यात भर म्हणून आता खारघर, तळोजा, पनवेल हा भाग सध्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांचे केंद्र बनले आहे. खारघर-तळोजा-पनवेल या भागात केलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल संशोधन अभ्यासांती हा निष्कर्ष काढण्यात आला. एक महिन्याच्या अभ्यासाअंती पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्युटंट) या कणांची पातळी सकाळच्या वेळेत सर्वाधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा वेळी मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी दररोज १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने सुमारे महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निरीक्षण नोंदविले. या अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदवली गेली. दरम्यान, या पट्ट्यातील हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आकडेवारीनुसार गेल्या महिनाभर पनवेलमधील हवा प्रदूषित हाेती. जवळपास सर्वच दिवस हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली होती. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारणीभूत ठरतात. पीएम. २.५ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरक्याचेही कारण ठरते.एमआयडीसी तळोजा, सेक्टर १३ पनवेल, सेक्टर ३६ खारघर, नावडे, तळोजा आणि सेक्टर ७ खारघर येथे १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात हा अभ्यास करण्यात आल्याची माहिती वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी दिली. या अभ्यासामागचे महत्त्वाचे कारण हवेची गुणवत्ता तपासणे एवढेच नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या-त्या वेळच्या हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविण्यातले अपयश अधोरेखित करणेही आहे.या ठिकाणच्या आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्या फराह ठाकूर म्हणाल्या की, या ३१ दिवसांत पनवेल परिसरात पीएम २.५ची पातळी सरासरी १०१.१२ इतकी होती, जी भारतीय मानकांच्या (६० मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर) तुलनेत १.७ पटींनी तर डब्ल्यूएचओ मानकांच्या (२५ मायक्राे ग्रॅम प्रति घनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त आहे. सर्व पाचही ठिकाणांपैकी तळोजा एमआयडीसी परिसरात पीएम २.५ची पातळी सर्वांत जास्त आढळली.
प्रदूषकांमुळे आजारांना आमंत्रणप्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात.- डॉ. संदीप साळवी