मुंबईत प्रदूषण वाढले; बीकेसी आणि नवी मुंबई सर्वाधिक प्रदूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:34 AM2020-12-17T04:34:57+5:302020-12-17T04:34:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धूर, धूळ आणि धूरके याच्या वाढत्या प्रमाणासह उर्वरित घटकांमुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढच होत असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धूर, धूळ आणि धूरके याच्या वाढत्या प्रमाणासह उर्वरित घटकांमुळे मुंबईच्या प्रदूषणात वाढच होत असून, बुधवारी सफरकडून वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, बोरीवली आणि नवी मुंबई ही चार ठिकाणे प्रदूषित नोंदविण्यात आली आहेत.
सफर या संकेतस्थळावर मुंबईतल्या प्रदूषणाची नोंद केली जाते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. हिवाळ्यात यात आणखी भर पडली आहे. सकाळी, दुपारी आणि सायंकाळी मुंबईतील दृश्यमानता कमी होत असल्याचे चित्र आहे. बुधवारच्या नोंदीनुसार, माझगाव, कुलाबा आणि वरळी येथील हवा समाधानकारक नोंदविण्यात आली आहे. तर वांद्रे-कुर्ला संकुलातील हवा अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. नवी मुंबईतील हवाही अत्यंत खराब नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल अंधेरी आणि बोरीवली येथील हवेची नोंद खराब म्हणून झाली आहे. तर भांडुप, मालाड आणि चेंबूर येथील हवा मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली आहे.
मुंबईचे किमान तापमान बुधवारी २१ अंश नोंदविण्यात आले असून, गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबई अंशत: ढगाळ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याचा विचार करता २० डिसेंबरपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
--------------------
प्रदूषणाची कारणे
उद्योग
कोळसा ज्वलन
विविध वायू ज्वलन
वाहतूक
कचरा ज्वलन
बांधकामे
रस्त्यावरील धूळ
घरगुती प्रदूषण
--------------------
गेल्या वर्षीच्या थंडीच्या तुलनेत यावर्षीच्या थंडीत मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण येथे नोंदविण्यात येणारे प्रदूषण अधिक आहे. यास इंधन ज्वलन, पार्किंग इतर असे अनेक घटक कारणीभूत आहेत. मुळात येथील स्वच्छ हवेसाठी कृती आराखडा हाती घेत त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. असे केल्यास निश्चितच आपण प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल.
- अविकाल सोमवंशी, प्रोगाम मॅनेजर, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यमेंट
--------------------