Join us

प्रदूषणाचा मोर्चा खारघर, तळोजा, पनवेलकडे...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 3:42 PM

Pollution news : प्रदूषणामुळे मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी घातक

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक परिसर सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, बीकेसी, चेंबर, कुर्ला सारख्या परिसरांनी प्रदूषणाची कमाल पातळी गाठली आहे. आणि आता यात भर म्हणून की काय खारघर, तळोजा, पनवेल हा भाग सध्या निवासी व व्यावसायिक प्रकल्पांचे केंद्र बनले आहे. खारघर-तळोजा-पनवेल या भागात करण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल संशोधन अभ्यासांती हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एक महिन्याच्या अभ्यासाअंती  पीएम २.५ (पार्टीक्युलेट मॅटर पोल्यूटंट) या कणांची पातळी सकाळच्या वेळेत सर्वाधिक असल्याचे आढळून आले. म्हणजेच मॉर्निंग वॉक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी दररोज १७ तास प्रदूषित हवेत श्वास घेत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने सुमारे महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर हे निरीक्षण नोंदवले आहे. या अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदली गेली आहे. दरम्यान या पट्ट्यातील हवेच्या गुणवत्तेशी संबंधित आकडेवारीनुसार गेल्या महिन्याभरात पनवेल प्रदूषित हवेच्या दिवसांना सामोरे  गेले आहे. त्यापैकी जवळपास सर्व दिवसांत हवेच्या प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली होती. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. पीएम. २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरकंयाचंही कारण ठरते.एमआयडीसी तळोजा, सेक्टर १३ पनवेल, सेक्टर ३६ खारघर, नावडे, तळोजा आणि सेक्टर ७ खारघर येथे १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात हा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट यांनी दिली. या अभ्यासामागचे महत्त्वाचे कारण हवेची गुणवत्ता तपासाणे एवढंच नाही तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या त्या वेळच्या हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविण्यातले अपयश अधोरेखित करणेही आहे.या ठिकाणच्या आकडेवारीचे विश्लेषण करणाऱ्या फराह ठाकूर म्हणाल्या की, या ३१ दिवसांत पनवेल परिसरात पीएम २.५ ची पातळी सरासरी १०१.१२ इतकी होती. जी भारतीय मानकांच्या ( ६० मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर) तुलनेत १.७ पटींनी तर डब्ल्यू एच ओ मानकांच्या ( २५ मायक्राे ग्रॅम प्रति घनमीटर ) तुलनेत चार पटींनी जास्त आहे. सर्व पाचही ठिकाणांपैकी तळोजा एमआयडीसी परिसरात पीएम २.५ ची पातळी सर्वांत जास्त आढळली. वातावरण या अभ्यासाचा विस्तृत अहवाल महापालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधींना तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करणार आहे.------------------------तज्ज्ञ काय म्हणतातया प्रदूषकांमुळे वारंवार फुप्फुसांचा संसर्ग, दमा, दीर्घकाळ टिकणारे श्वसन संस्थेचे आजार आणि वृद्धांमध्ये हृदयविकार संभवतात.- डॉ. संदीप साळवी------------------------आपल्या हातात असणारी एकमेव गोष्ट म्हणजे स्त्रोतांमध्येच उत्सर्जन कमी करून हवेची गुणवत्ता श्वास घेण्या योग्य उंचावता येईल.- सुनील दहिया------------------------वातावरणचा हवा पाहणी अभ्यास आपल्याला तळोजा एमआयडीसी आणि परिसरातील हवेच्या गुणवत्तेत होणारे महत्त्वाचे बदल जाणून घेण्यास मदत करतो. हवेच्या प्रदूषणाने भारतीय सुरक्षित मानकांच्या पातळीहून खूप वरची पातळी गाठली आहे.- रोनक सुतरिया------------------------

टॅग्स :प्रदूषणमुंबईपर्यावरण