लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नव्या वर्षाची सुरुवातच प्रदूषणाने झाली असून, मुंबईतल्या प्रदूषणाने गुरुवारी कहर केला. गुरुवारी मुंबईची हवा अत्यंत वाईट नोंदविण्यात आली असून, चेंबूर, बीकेसी, नवी मुंबई, अंधेरी, बोरीवली, माझगाव, मालाड, कुलाबा, भांडुप या परिसरात हवेची गुणवत्ता खूपच वाईट नोंदविण्यात आली आहे. उतरोत्तर यात वाढच होत आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात यात कमालीची वाढ झाली असतानाच आता नोंदविण्यात आलेल्या प्रदूषणात ५०० मीटरहून अधिक अंतरावरीलदेखील नीट दिसत नसल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणात वाढ होत असून, गुरुवारीदेखील येथील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वाईट नोंदविण्यात आला. धूर, धूळ यांच्या मिश्रणाने धुरके तयार होत आहे. वातावरणात दिवसभर धूळ नोंदवण्यात येत आहे. मुंबई शहर आणि उपनगर अशा दोन्ही ठिकाणी वाईटरीत्या प्रदूषण नोंदविण्यात आहे. बीकेसी, चेंबूर आणि नवी मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून इतर परिसरदेखील प्रदूषित नोंदविण्यात येत आहेत. दुसरीकडे प्रदूषणाने कहर केला असतानाच पावसाचा अवकाळी शिडकावा होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबई ढगाळ नोंदविण्यात येत आहे. बुधवारी रात्रीदेखील मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. गुरुवारी मुंबई किंचित ढगाळ असली तरी पावसाचा शिडकावा झाला नाही. मात्र उपनगरात मोठ्या प्रमाणावर धुरके पसरले होते. कुर्ला, बीकेसी आणि विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. ५०० मीटरहून अधिक अंतरावर असलेला परिसर धुरकट दिसत होता. सकाळी, दुपारी, सायंकाळी मुंबईत अशीच परिस्थिती होती.
कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मार्च ते नोव्हेंबरदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान हवा समाधानकारक नोंदविण्यात आली होती. मात्र ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात शिथिल झालेल्या लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा मुंबई प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेली मुंबई सातत्याने प्रदूषित नोंदविण्यात येत असून, मुंबई खालोखाल ठाणे, डोंबिवली आणि नागपूर सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात येत आहे. प्रदूषणात धूळ, धूरसारख्या सूक्ष्म धूलिकणांचा समावेश असून, याचा धोका दिवसागणिक वाढतच आहे. विशेषत: प्रदूषित वायू यात भर घालत असून, धोकादायक स्थिती दिवसागणिक वाढतच आहे.
-----------------------
हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल
दुसरीकडे कर्नाटक किनारपट्टीपासून महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. ८ जानेवारी रोजी मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील. तर ९ जानेवारी रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
-----------------------
- गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले.
- राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १६ अंश नोंदविण्यात आले आहे.
- गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
- मराठावाडा आणि विदर्भ येथे हवामान कोरडे होते.
- मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.
-----------------------
उद्योग, कोळसा ज्वलन, विविध वायू ज्वलन, वाहतूक, कचरा ज्वलन, बांधकामे आणि रस्त्यावरील धूळ, घरगुती प्रदूषण हे प्रदूषणाचे स्रोत आहेत. धूळ आणि वाहनांतून निघणारा धूर वायुप्रदूषणास कारणीभूत आहे.
----------------
० ते ५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगला मानला जातो.
५१ ते १०० पर्यंत नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक साधारण चांगला मानला जातो.
१०१ ते १५० दरम्यान नोंदविण्यात येणारा हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक आजारी नागरिकांसाठी धोकादायक मानला जातो.
----------------
वायुप्रदूषण
पार्टीक्युलेट मटॅर (पीएम २.५ / अति सूक्ष्म धूलिकण)
मुंबई ३११
चेंबूर ३०९
बीकेसी ३१५
नवी मुंबई ३२५
अंधेरी ३१७
बोरीवली ३२६
माझगाव ३२२
मालाड ३२६
कुलाबा ३१८
भांडुप २००