प्रदूषण रडारवर, पालिकेकडून उपाययोजना
By सीमा महांगडे | Updated: January 21, 2025 13:16 IST2025-01-21T13:15:55+5:302025-01-21T13:16:11+5:30
Mumbai Pollution News: मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत असल्याने महापालिका टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

प्रदूषण रडारवर, पालिकेकडून उपाययोजना
- सीमा महांगडे
मुंबई - मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे सर्व स्तरांतून चिंता व्यक्त होत असल्याने महापालिका टीकेची धनी ठरली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विविध भागांतील प्रदूषणाची पातळी मोजणारी पुरेशी यंत्रणा उभारण्याचे पालिकेने ठरविले आहे. प्रदूषणाची नोंद घेणाऱ्या आणखी ४ मोबाइल व्हॅन घेण्याचा निर्णय पालिकेच्या पर्यावरण विभागाने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या व्हॅन पालिकेच्या ताफ्यात येणार आहेत.
मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावत असल्याने बांधकामांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने थेट नोटिसा बजावत अनेक बांधकामे थांबविली. पालिकेकडून विभागीय स्तरावर यासाठी विशेष पथकेही तैनात केली आहेत. मात्र, कारवाई करतानाच प्रदूषणाची पातळी नोंदविणाऱ्या यंत्रणेची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दीर्घकालीन उपाययोजना महत्त्वाच्या
वायू प्रदूषणाबाबत पालिका करत असलेल्या दीर्घकालीन योजनांमध्ये मोबाइल व्हॅनचा समावेश आहे.
याप्रमाणेच रस्त्यांची सुधारणा करणे, लाकूड व कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या व भट्ट्यांना वर्षभरात स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे पालिकेने ठरविले आहे.
७७ प्रदूषणकारी बेकऱ्या बंद
प्रदूषणकारी ७७ बेकऱ्या बंद करण्यासाठी कायदेशीर कारवाईही केली जात आहे. ‘बेस्ट’मध्ये विद्युत वाहने विकत घेण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच प्रदूषणाच्या तक्रारींसाठी ॲप तयार करण्यात आले आहे.
तत्काळ व्हॅन पाठवता येणार
पालिकेच्या हेल्पलाइनवर प्रदूषणाबाबत मोठी तक्रार आल्यास मोबाइल व्हॅन पाठवून प्रदूषण पातळी मोजली जाते.
सध्या महापालिकेकडे एकच व्हॅन असल्याने सर्व तक्रारींची दखल घेणे अवघड होते. त्यामुळेच शहराची व्याप्ती लक्षात घेत आणखी ४ व्हॅन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता असलेल्या भागात तत्काळ व्हॅन पाठवून आवश्यक उपाययोजना करता येतील.
सध्या भायखळा, घाटकोपर, गोवंडी, कांदिवली, शिवडी येथे प्रदूषणाची पातळी मोजणारी यंत्रणा आहे. पण प्रदूषणाच्या पातळीचे मोजमाप करणारी मोबाइल व्हॅन मात्र एकच आहे. त्यामुळे प्रशासनाकडून प्रदूषणाचे मोजमाप करणाऱ्या व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाइल व्हॅनचा असा होणार वापर
मोबाइल व्हॅनद्वारे तक्रार आलेल्या ठिकाणी प्रदूषणाची पातळी मोजता येईल. त्यावर तत्काळ आवश्यक उपाययोजना करता येतील.
मोबाइल व्हॅनमध्ये आवश्यक यंत्रणेसह अत्याधुनिक साहित्यही उपलब्ध असणार आहे.
वाहतूक कोंडी असणाऱ्या भागात वायू गुणवत्ता निर्देशांकावर देखरेख ठेवणे शक्य होईल.
शहर व उपनगरांतील विविध ठिकाणांच्या प्रदूषणाची रिअल टाईम माहिती देऊन प्रदूषण नियंत्रणाच्या योजनांवर काम करणे सोपे होईल.