प्रदूषणाचे सर्व्हर डाऊन! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी यंत्रणांच्या वेबसाइटवरील विभाग बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:09 IST2025-01-02T14:07:51+5:302025-01-02T14:09:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाची पातळी खालावली आहे...

छाया : दत्ता खेडेकर
मुंबई : मुंबई महापालिकेसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरील प्रदूषणाची माहिती देणारा विभाग वर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने बंद होता. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी फोडलेले फटाके आणि इतर प्रदूषणामुळे मुंबई किती प्रदूषित होती? याची माहिती पर्यावरण अभ्यासक आणि मुंबईकरांना मिळाली नाही. वर्षाची सुरुवातच वाईट असेल, तर वर्षभर प्रदूषणाची माहिती कशी मिळणार? असा सवाल त्यांनी केला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रदूषणाची पातळी खालावली आहे. मुंबईकरांनी मंगळवारी रात्री नववर्षाचे स्वागत करताना गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह चौपाटी यासह दादर चौपाटी आणि शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे प्रदूषण वाढल्याचे दिसत होते.
मात्र, यंत्रणांचे सर्व्हर डाऊन असल्याने प्रदूषणाची आकडेवारी बुधवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळाली नाही. मुंबईकरांनी केलेल्या आतषबाजीमुळे नेमके किती प्रदूषण वाढले, याची माहिती यामुळे देता येत नसल्याचे पालिकेच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रमुख अभियंता अविनाश काटे यांनी दिली.
वर्षाची सुरुवात अशी होत असेल, तर वर्षभर मुंबईकरांना प्रदूषणाचे आकडे कसे समजतील आणि प्रदूषण कसे कमी होईल? हा प्रश्न अनुत्तरित आहे. वेबसाइटची देखभाल-दुरुस्ती करतानाच प्रदूषणाची आकडेवारी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना मिळाली पाहिजे.
- सुमेरा अब्दुलअली, संस्थापक अध्यक्ष, आवाज फाउंडेशन
फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निश्चितच प्रदूषणात वाढ झाली आहे. त्याची पातळी फार नाही. मात्र, याबाबतची माहिती अद्ययावत करणारी आणि नोंदवून घेणारी वेबसाइट मंगळवार दुपारपासून बंद आहे, तर याबाबत काम करणारा सर्व्हरही डाऊन असल्याने माहिती अपडेट झाली नाही.
- अविनाश काटे, प्रमुख अभियंता, पर्यावरण विभाग, मुंबई महापालिका
...हे बरोबर नाही
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई प्रदूषित नोंदविली जात आहे. नववर्षाच्या स्वागतादरम्यान केलेल्या आतषबाजीमुळे प्रदूषण वाढले आहे. पहिल्याच दिवशी प्रदूषणाचे आकडे उपलब्ध होत नाहीत हे बरोबर नाही, अशी टीका पर्यावरण अभ्यासकांनी केली.
बीकेसीचे काय करणार ते सांगा?
मुंबईचे आर्थिक केंद्र असणाऱ्या बीकेसीमध्ये तर प्रदूषणाने कहर केला आहे. येथील वायुप्रदूषणाची पातळी दिवसागणिक वाढत आहे. तेथे सुरू असलेली मेट्रो, बुलेट ट्रेन प्रकल्पांसह रस्त्यांची कामे यास जबाबदार आहेत. दुर्दैव म्हणजे बीकेसीमधील प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्याचा प्राधिकरणाकडून उपाय योजना करण्यात येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, अशी माहिती अॅड. राकेश पाटील यांनी दिली.
धुरके आणि धूर
फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून असलेले धुरके आणि प्रदूषण यामध्ये अधिक वाढ झाली. दादर आणि वरळी परिसरात पहाटेसुद्धा जवळच्या अंतरातवरचे काहीही दिसत नव्हते. सर्वत्र धुरके आणि धूर दिसत होता. यामुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढल्याचे स्पष्ट होत होते.