पॉलीप्रॉपीलीन पिशवी म्हणजे प्लॅस्टिकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:27 AM2018-04-30T04:27:41+5:302018-04-30T04:27:41+5:30
राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी जाहीर केल्याननंतर, दुकानांमधल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जागा कापडी, ज्यूट आणि पॉलीप्रॉपीलीनच्या पिशव्यांनी घेतली आहे.
- अक्षय चोरग
मुंबई : राज्य सरकारने प्लॅस्टिकवर बंदी जाहीर केल्याननंतर, दुकानांमधल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची जागा कापडी, ज्यूट आणि पॉलीप्रॉपीलीनच्या पिशव्यांनी घेतली आहे.
कापडी व ज्यूटच्या पिशव्यांपेक्षा स्वस्त असल्यामुळे आणि कापडी पिशवीप्रमाणे दिसत असल्यामुळे, पॉलीप्रॉपीलीनच्या पिशव्यांची खरेदी-विक्री सुरू आहे, परंतु पॉलीप्रॉपीलीन प्लॅस्टिकच असल्याने पर्यावरणासाठी ते प्लॅस्टिकइतकेच घातक आहे, अशी माहिती माटुंगा येथील इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांनी दिली.
प्लॅस्टिक बंदीनंतर सर्वांचेच धाबे दणाणले. त्यामुळे बाजारांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून काय वापरावे याचा शोघ सुरू आहे. मात्र, १ रुपयांपासून ते १० रुपयांपर्यंत किमतीच्या पॉलीप्रॉपीलीनच्या पिशव्यांची विक्री सध्या सर्वत्र सुरू आहे.
कापडी पिशव्यांच्या किमती ३० रुपये ते ७० रुपये आहेत. ज्यूटच्या पिशव्या किमतीने सर्वात महाग असून, त्या १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र, स्वस्त असल्यामुळे लोक पॉलीप्रॉपीलीनच्या पिशव्या वापरण्याला प्राधान्य देत आहेत.
पॉलीप्रॉपीलीन कसे तयार केले जाते?
प्लॅस्टिकपासून पॉलीइथिलीन तयार केले जाते. पॉलीइथिलीनपासून पॉलीआॅलिफिन्स हा घटक तयार केला जातो. पॉलीआॅलीफिन्सवर प्रक्रिया केल्यानंतर पॉलीप्रॉपीलीन तयार होते. पॉलीप्रॉपीलीनची एक जाळी तयार केली जाते. या जाळीपासून पिशव्या, टोप्या बनविल्या जातात. पिशवी जाळीदार असल्यामुळे त्यातून पाणी आणि इतर द्रव पदार्थ आरपार जातात.
पॉलीप्रॉपीलीन प्लॅस्टिकचाच घटक आहे. ते पर्यावरणासाठी घातक आहे. प्लॅस्टिकपेक्षा घनता कमी असल्यामुळे त्याचे प्लॅस्टिकइतके तीव्र परिणाम होत नाहीत. मात्र, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिशव्या अडकल्यानंतर नाले व गटारे तुंबू शकतात.
या पिशव्या वापरण्याची कारणे
पॉलीप्रॉपीलीनीची पिशवी कापडासारखी दिसते.
या पिशवीचा कापडी पिशवीप्रमाणे पुनर्वापर होतो.
पिशवी जाळीदार असल्याने कपडी पिशवीप्रमाणे त्यातून पाणी आणि इतर द्रव पदार्थ आरपार जातात.
प्लॅस्टिकच्या पिशवीप्रमाणे चकचकीत नसते आणि आवाज होत नसल्याने लोकांचा गैरसमज होत आहे.