संस्थांना पहिल्या वर्षाकरिता अध्यापनाची प्रक्रिया ऐच्छिक स्वरूपात राबविता येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका शिक्षण सेमी इंग्रजी अर्थात मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) भाषेतून शिकवण्यात येणार आहे, तसेच मराठीतून उत्तरे लिहिण्याची मुभा मिळणार आहे. त्यासाठी अध्यापनाची प्रक्रिया मराठी-इंग्रजी भाषेमध्ये राबविण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजी या माध्यमातून अध्यापनाकरिता इच्छुक संस्थांकडून अभ्यासक्रमनिहाय पर्याय घेण्यात यावा व अशा संस्थांनी संबंधित अभ्यासक्रमाची अध्यापन प्रक्रिया मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) राबवावी, अशा सूचना राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक विनोद मोहितकर यांनी दिल्या आहेत. प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील विद्यार्थ्यांसाठी मंडळाने मराठीतून विकसित केलेल्या सैद्धांतिक विषयांच्या शिक्षण सामग्रीचा वापर अध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता तसेच विद्यार्थ्यांनी अध्ययनाकरिता करावा, असेही त्यांनी सांगितले. प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्रातील प्रमुख सैद्धांतिक विषयांची शिक्षण सामग्री मंडळामार्फत तयार करण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त इतर सर्व अभ्यासक्रमाची शैक्षणिक सामग्री मराठी, इंग्रजी (द्विभाषिक) असा पर्याय देणाऱ्या संस्थांना त्यांच्या स्तरावर तयार करावी लागणार आहे.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे पाठ्यक्रम व प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्येच राहतील; मात्र विद्यार्थ्यांना सैद्धांतिक परीक्षांमध्ये मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) मध्ये उत्तरे लिहिण्याची सुविधा देण्यात येईल व विद्यार्थ्याच्या आकलन क्षमतेनुसार संबंधित शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासून गुण प्रदान करण्यात येतील, असे संस्थांना सांगण्यात आले आहे, तसेच बहुपर्यायी प्रश्नावली माध्यमातून होत असलेल्या ऑनलाइन परीक्षा मात्र इंग्रजी माध्यमातूनच होतील. पहिल्या वर्षाकरिता मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) ऐच्छिक स्वरूपाचा अभ्यासक्रम ज्या अभ्यासक्रमांकरिता राबविण्यात येईल त्या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संवाद कौशल्य वाढविण्याकरिता इंग्रजी ट्यूटोरिअल प्रॅक्टीकल संस्था स्तरावर राबविण्यात यावे, जेणेकरून द्वितीय व तृतीय वर्षात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, अशा सूचनाही संस्थांना देण्यात आल्या आहेत.
मंडळाशी संलग्नीकरणाची माहिती भरताना संस्थेने अभ्यासक्रमनिहाय इंग्रजी किंवा मराठी, इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापन पूर्ण करण्याच्या पर्यायापैकी एक पर्याय निवडावा. ज्या संस्थांना मराठी-इंग्रजी दोन्हींचा पर्याय निवडायचा आहे, त्यांनी संस्थेच्या लेटरहेडवर त्याचे हमीपत्र (द्विभाषिक) अभ्यासक्रम राबविण्याचा मूळ प्रतीत मंडळाच्या विभागीय कार्यालयात सादर केल्यानंतरच संलग्नीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.