Join us

डाळिंब निघाले अमेरिका वारीला; २०१८ पासून होती बंदी; १५० किलो डाळिंब रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 6:36 AM

गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाचे ४५० खोके म्हणजे १५० किलो डाळिंब विमानाने न्यूयॉर्कला पाठविण्यात आले.

नवी मुंबई : डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे २०१८ पासून अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यानंतर केंद्र सरकार, प्लांट क्वारंटाइन, इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा केल्यानंतर २०२२ पासून निर्यातबंदी उठली. मात्र, त्यासाठी काही नियम आणि अटी घातल्या आहेत. त्यानुसार डाळिंबाच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया करून गुरुवारी प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाचे ४५० खोके म्हणजे १५० किलो डाळिंब विमानाने न्यूयॉर्कला पाठविण्यात आले.

नवी मुंबईतल्या तुर्भे येथील अपेडा कार्यालयाच्या जनरल मॅनेजर विनिता सुधांशू यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी अपेडाचे चेअरमन अभिषेक देव, मुंबई प्रादेशिक विभागाचे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, मुंबई विभागाचे प्रमुख ब्रजेश मिश्रा, कृषी पणन मंडळाचे मिलिंद जोशी, अपेडाचे उपसंचालक ब्रिजेश मेहता, अमेरिकेच्या निरीक्षक डॅग्नी वॅझेक्युझ, विकिरण सुविधा केंद्राचे प्रमुख सतीश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, सोलापूरच्या डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड, डॉ. जी. पी. सिंग, एनआरसीचे संचालक डॉ. मराठे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चर मार्केटिंग बोर्डचे संचालक संजय कदम, आयएनआय फॉमचे संचालक पंकज खंडेवाल आदी उपस्थित होते.

त्वचेसाठी असाही फायदा

या निर्यातीनंतर अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे. भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे ॲन्टी ऑक्सिडंट आहेत. तिथल्या त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणाऱ्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश केला आहे. 

भारतीय डाळिंबांनी अमेरिकेची बाजारपेठ काबीज केल्यानंतर राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.- नागपाल लोहकरे, उपमहाव्यवस्थापक, मुंबई प्रादेशिक विभाग, अपेडा