तलाव काठोकाठ भरले; वर्षभराची तहान भागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 02:50 AM2019-09-06T02:50:05+5:302019-09-06T02:50:09+5:30
चिंता मिटली : मुंबईकरांना दिलासा; ९७ टक्के जलसाठा
मुंबई : मुंबईलापाणीपुरवठा करीत असलेल्या सातही तलाव क्षेत्रांमध्ये पावसाची तुफान फटकेबाजी सुरू आहे. परिणामी, सातही तलाव काठोकाठ भरत असून, मुंबईकरांची वर्षभराची तहान जवळपास भागणार आहे. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ सप्टेंबरपर्यंत सातही तलावांत एकूण ९७.८५ टक्के एवढा वापरायोग्य पाणीसाठा असून, उत्तरोत्तर यात वाढच होणार आहे.
तुळसी, तानसा, विहार, मोडक सागर आणि विहार हे तलाव केव्हाच ओव्हरफ्लो झाले असून, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा हे तलाव काठोकाठ भरण्याच्या तयारीत आहेत. तलाव क्षेत्रात या वर्षी जोरदार पाऊस होत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे तलावांमध्ये १५ टक्के जलसाठा कमी जमा झाला. परिणामी, नोव्हेंबर २०१८ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र तलावांमध्ये ५० टक्के जलसाठा जमा झाला; आणि गेल्या महिन्यात पाणीकपात रद्द करण्यात आली. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. आता तो १४ लाख १६ हजार २१७ दशलक्ष लीटर एवढा आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे़ गेल्या वर्षी परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने मुंबई पाणी कपात लागू करण्यात आली होती़
तलावांची पातळी मीटरमध्ये
अप्पर वैतरणा ६०३.३०
मोडक सागर १६३.१५
तानसा १२८.६१
मध्य वैतरणा २८४.५०
भातसा १४१.२७
विहार ८०.६२
तुळसी १३९.६०