डबेवाले चालती पंढरीची वाट
By admin | Published: June 30, 2017 03:18 AM2017-06-30T03:18:03+5:302017-06-30T03:29:47+5:30
‘पुढे गेले हरिचे दास। त्यांची आस आम्हांसी’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकऱ्यांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठूमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘पुढे गेले हरिचे दास। त्यांची आस आम्हांसी’ या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकऱ्यांसह आता मुंबईच्या डबेवाल्यांनाही विठूमाउलीच्या दर्शनाची आस लागली आहे. त्यामुळे दोन दिवस डबे पोहोचविण्याची सेवा बंद करून डबेवाले वारीला जाणार आहेत. ४ आणि ५ जुलै रोजी म्हणजेच एकादशी आणि द्वादशी अशा दोन दिवशी डबेवाले वारीसाठी सुट्टीवर जाणार आहेत.
बहुतांश डबेवाले बांधवांची गावे ही देहू-आळंदी याच परिसरात आहेत. बऱ्याच डबेवाल्यांच्या घरात आषाढी वारीची परंपरा आहे. डबे पोहोचवण्याचा व्यवसाय असल्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालखीसोबत वारी करावयास मिळत नाही ही खंत डबेवाल्यांना असते. मग दोन दिवसांची रजा घेऊन डबेवाले एकादशीच्या दिवशी वाहनाने पंढरपूरला पोहोचतात. चंद्रभागा स्नान, पांडुरंग दर्शन व दुसरे दिवशी द्वादशीचे उपवासाचे पारणे फेडून पांडुरंगाचा निरोप घेऊन कामावर रुजू होण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागतात, अशी माहिती प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली.