Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण
By मुकेश चव्हाण | Published: February 15, 2021 08:37 PM2021-02-15T20:37:26+5:302021-02-15T20:37:40+5:30
शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अरूण राठोड या तरूणाचं नाव प्रखरतेने समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे, यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केली असा आरोप भाजपाकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.
पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. संजय राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपानंतर संजय राठोड हे गायब झाले आहेत. त्यांचा फोनही लागत नाही. मुंबई आणि यवतमाळमधील त्यांच्या निवासस्थानीही ते नाहीत. त्यामुळे संजय राठोड नेमके आहेत कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेत देखील या मुद्द्यावरुन दोन मतप्रवाह निर्माण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा शिवसेनेते एक मतप्रवाह आहे.
दुसरीकडे पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाची आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्याच्याच जोरावर संजय राठोड वाचण्याची शक्यताही बोलली जातेय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्वीधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आतातरी संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाहीये. मात्र ते देण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तत्पूर्वी, पूजाच्या आत्महत्येसंदर्भात ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. त्यातील आवाज पूजाचा नाही. पूजाच्या मृत्यूप्रकरणी आपली कोणाविरोधातही तक्रार नाही, कुणाविषयी शंका नाही. त्यामुळे आमची आणि समाजाची बदनामी करून आम्हाला वेदना देऊ नका, अशी विनंती लहू चव्हाण यांनी केली आहे. या प्रकरणात ज्यांचे नाव जोडले जात आहे, ते मंत्री संजय राठोड हे पूजाच्या वडिलांसारखे आहेत, असे लहू चव्हाण ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले आहेत.
मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल- गृहमंत्री
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी भाजपाकडून होत आहे. मात्र संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी केली जाईल. चौकशीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड बोलणार; धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडण्याची शक्यता https://t.co/WvwjEdKd3i
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2021