Pooja Chavan Suicide: मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन
By पूनम अपराज | Published: February 22, 2021 06:46 PM2021-02-22T18:46:08+5:302021-02-22T18:47:08+5:30
Pooja Chavan Suicide Case : या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही अतिशय संदिग्ध आहे. याप्रकरणात पूजाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात चित्र वाघ यांनी नमूद केले आहे.
पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे. आज याप्रकरणात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्र वाघ यांनी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा यासंदर्भात निवेदन दिले आहे.
त्याच दरम्यान प्रसिद्धीमाध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी, भाऊ यांनी मात्र आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती म्हणत ही हत्या असून याची चौकशी व्हावी ही मागणी केली. दरम्यान १२ ऑडियो क्लीप बाहेर आल्या, ज्यात पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून तर आत्महत्येनंतर दरवाजा तोड. पण तीचा मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतच संभाषण आहे. हा आवाज दुसरा तिसरा कोण नसून राज्याचा शिवसेनेचा वनमंत्री संजय राठोडचा आहे. काही फोटो ही आहेत ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती हे ही दिसतंय, इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता आहे, वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Video : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा - चित्रा वाघ
पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पूजा प्रकरणातला अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी संजय राठोड याच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण कसा काय होऊ शकतो, ज्याची साधी चौकशीही पुणे पोलिसांनी केली नाही, असा सवाल वाघ यांनी उचलून धरला आहे. पूजाचा लॅपटॉप, तिचा मोबाईल, पोलिसांना मिळाले का ? त्यातून काही माहिती समोर आली का? १२ बाहेर आलेल्या ऑडिओ क्लीपची तपासणी केली का ? पूजा गॅलरीतून पडली म्हणताना तिच्यासोबत राहणाऱ्या दोन मुलांना जे घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते त्यांची जुजबी चौकशी करून पोलिसांनी कसे काय सोडून दिले, त्यांना त्यावेळीच ताब्यात का नाही घेतले ? नंतर शोधपथक पाठवले, तेव्हा दोन्ही फरार होते. त्यातल्या एकाला परवा पकडले, दसरा अद्याप फरार आहे. मंत्री संजय राठोड बेपत्ता आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही अतिशय संदिग्ध आहे. याप्रकरणात पूजाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात चित्र वाघ यांनी नमूद केले आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात @PuneCityPolice चीं संदिग्ध भुमिका संशयीत मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता या संदर्भात
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 22, 2021
आज दुपारी ३:३० वा.मा.पोलिस महासंचालक यांची
तर
संध्या.४.४५ वा.महामहीम राज्यपाल यांची राजभवन येथे भेट घेत आहे @BJP4Maharashtra@MahaPolice@maha_governor