मुंबई- गेल्या आठवड्यामध्ये एल्फिन्स्टन स्टेशनवर प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला. त्यादिवशी स्टेशनवर पसरलेल्या अफवेमुळे ही चेंगराचेंगरी झाली, असं बोललं जातं होतं. याप्रकरणी एका 19 वर्षीय मुलीने तपासात दिलेली माहिती धक्कादायक आहे. शिल्पा विश्वकर्मा ही 19 वर्षीय तरूणी एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीतून थोडक्यात बचावली आहे. रेल्वेच्या चौकशी समितीसमोर शिल्पाने घटनेबद्दलची माहिती दिली. एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील प्रचंड गर्दीत भारा वाहणाऱ्या व्यक्तीकडील फुलं पडली आणि ‘फुलं पडली’ म्हणता म्हणता उच्चारसाधर्म्याने ‘पूल पडला’ असा अनेक प्रवाशांचा गैरसमज झाल्याने गोंधळ उडून चेंगराचेंगरीची घटना घडली. शॉर्टसर्किट किंवा इतर कोणतीही अफवा चेंगराचेंगरी व्हायला कारणीभूत नव्हती, तर पावसामुळे पुलावर प्रचंड गर्दी झाली असताना, क्षमतेपेक्षा जास्त फुलं वाहणाऱ्या व्यक्तीचा तोल गेल्याने ही दुर्घटना झाल्याचं यातून वाचलेल्या शिल्पा विश्वकर्माने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
एल्फिन्स्टन रोड येथे राहणारी शिल्पा बारावीनंतर इंजिनीअरिंग शिक्षणाच्या तयारीसाठी दररोज विलेपार्लेला ला जाते. सकाळी १० वाजल्यानंतर स्लो लोकल पकडण्यासाठी ती या पुलावरून जाते. दुर्घटना झाली त्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी शिल्पा नेहमीप्रमाणे क्लासला जाण्यासाठी निघाली होती. पुलावर गर्दी असल्याने शिल्पा त्या गर्दीत पडली, पण त्याच वेळी गर्दीतील एका व्यक्तीने तिला बाहेर खेचलं त्यामुळे शिल्पाचा जीव वाचला, पण तिला दुखापत झाली आहे. शिल्पाच्या हाताला, पायाला, पाठीला आणि पोटाला दुखापत झाली. तिला लगेचच केईएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
त्यादिवशी पुलावर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. पाऊस असल्याने अनेकजण भिजू नये म्हणून पुलावरच थांबून राहिले होते. त्यामुळे गर्दी वाढत गेली. मी पुलाच्या मधोमध असतानाच आवाज सुरू झाला. पुलावरील तिकीट खिडकीजवळील भागात डोक्यावर फुलांचा मोठा भारा वाहून नेत असलेली एक व्यक्ती होती. तिच्या डोक्यावरून फुलं खाली पडू लागली. तेव्हाच ‘फूलं पडली’ असा आवाज ऐकू आला. त्यानंतर काही क्षणातच फुलांऐवजी ‘पूल पडला’ असा गैरसमज होऊन आवाज वाढल्याने गोंधळ सुरू झाला. या गोंधळात एका व्यक्तीचा पाय सरकला आणि त्यानंतर एकमेकांवर माणसे पडू लागली, अशी माहिती शिल्पाने दिली होती. सकाळी साधारण १०.१५ वाजता हा गोंधळ आणि चेंगराचेंगरी सुरू झाली. काय सुरू आहे तेच कळत नव्हतं. सगळीकडून फक्त ओरडण्याचा आवाज येत होता. पावसाचा जोर, पुलावर थांबलेल्या प्रवाशांची गर्दी या साऱ्यातून चेंगराचेंगरी सुरू झाल्याचं शिल्पाने सांगितलं आहे. मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या विभागीय कार्यालयात शिल्पा ही मंगळवारी आली होती. त्यावेळी तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला.
दादर पोलिसांकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत वीस साक्षीदारांची जबाब नोदंविले आहेत. शिल्पा विश्वकर्माने दिलेल्या जबाबाला आत्तापर्यंत चार जणांनी दुजोरा दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अजूनही अनेकांचे जबाब नोंदविणं बाकी असल्यामुळे पोलीस कुठल्याही निष्कर्षावर पोहचले नाहीत. प्रवाशांकडे असलेल्या व्हिडीओ आणि छायाचित्रांचा पोलिसांकडून अभ्यास केला जातो आहे.