Join us

तलावांची सुरक्षा ऐरणीवर

By admin | Published: June 15, 2014 1:24 AM

महापालिका क्षेत्रातील तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील तलावांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तलावांमध्ये व्यक्ती, मुले बुडून मरण्याच्या घटना सातत्याने घडत असताना देखील त्या ठिकाणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही सुरक्षेची उपाय योजना राबवण्यात आलेली नाही. मात्र लवकरच मासेमारी व बोटिंगसाठी तलाव संस्थांना दिल्यानंतर तेथे सुरक्षेची खबरदारी घेतली जाईल असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. शुक्र वारी रात्री कोपरखैरणे येथील तलावामध्ये तीन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. जर या ठिकाणी पालिकेच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असते तर ह१ दुर्घटना टळली असती अशी भावना लोकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. महापालिका क्षेत्रात एकूण २२ तलाव आहेत. त्यापैकी बहुतांशी तलाव असुरक्षित अवस्थेत आहेत. तलावांत बुडून मृत्यू पावणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. नेरूळ येथील चिंचोली तलावात आतापर्यंत अनेकांची बुडून मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच तलावांजवळ सुरक्षा रक्षक नेमावेत, अशी सूचना दोन वर्षापूर्वी नगरसेविका माधुरी सुतार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. त्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावाही केला होता. मात्र प्रशासानाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने विविध ठिकाणच्या तलावांत अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)