Join us

तलाव की कचराकुंडी?

By admin | Published: March 14, 2017 4:24 AM

कांदिवली पश्चिमेकडील चारकोपमधल्या आंबेडकर नगरलगतच्या भल्यामोठ्या सखल भागातल्या डबक्याला आता तलावाचे स्वरूप आले आहे.

सागर नेवरेकर , मुंबईकांदिवली पश्चिमेकडील चारकोपमधल्या आंबेडकर नगरलगतच्या भल्यामोठ्या सखल भागातल्या डबक्याला आता तलावाचे स्वरूप आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, याच दुर्गंधीयुक्त पाणी साचलेल्या सखल भागात कचराही टाकण्यात येत आहे. परिणामी, परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, या समस्येकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने कानाडोळा केला आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या काळातदेखील हा प्रश्न तडीस गेला नसल्याने याला डबके म्हणायचे, तलाव म्हणायचे की, कचराकुंडी म्हणायचे? या प्रश्नाची उकल सर्वसामान्यांना अद्याप झालेली नाही.‘लोकमत’ने या प्रश्नाच्या तळाशी जात जाणून घेतलेल्या माहितीनुसार, २००७ सालापासून हा परिसर जैसे थेच आहे. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका विकासकाने सदर परिसरातील माती काढून नेली. परिणामी, येथे सखल भाग निर्माण झाला. याच सखल भागालगत गोराई खाडी आहे. परिणामी, गोराई खाडीमधील पाणी सखल भागात शिरण्यास सुरुवात झाली. कालांतराने दुर्गंधीयुक्त पाणी साचलेल्या या भागात कचऱ्याची भर पडली. सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे सदर परिसराला स्थानिकांनी ‘तलाव’ संबोधण्यास सुरुवात केली. मात्र, ‘तलाव’ म्हटल्यानंतर हा परिसर स्वच्छ होण्याऐवजी दिवसेंदिवस गलिच्छ होऊ लागला आहे.