Poonam Mahajan on Pramod Mahajan Death : माजी खासदार पूनम महाजन यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्ये संदर्भात त्यांच्या कन्या पूनम महाजन यांनी मोठा दावा केला आहे. पूनम महाजन यांनी केलेला दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्यामागे मोठे षडयंत्र होतं आणि ते कधीतरी बाहेर येईलच असा दावा पूनम महाजन यांनी केला आहे. प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर जवळपास वीस वर्षांनी त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.
२००६ मध्ये भाजप नेते आणि माजी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रमोद महाजन यांची त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी हत्या केली होती. प्रवीण महाजन यांनी २२ एप्रिल २००६ रोजी मुंबईतील वरळी येथील प्रमोद यांच्या फ्लॅटमध्ये त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र आता, केवळ पैशांसाठी किंवा मत्सरापोटी झालेलं हे कृत्य नसून त्याच्यामागे मोठे षड्यंत्र आहे, असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूनम महाजन यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे जवळपास १८ वर्षांनी या हाय प्रोफाईल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
"प्रमोद महाजनांवर झाडलेली गोळी ही एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची नव्हती. कारण त्या गोळीचे आणि बंदुकीचे पैसे माझ्या वडिलांनीच दिले होते. पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केस लढू शकला असता तुमचं आयुष्य घालवू शकला असता. पण त्याच्या मागे ती गोळी एका माणसाच्या रागाची किंवा मत्सराची नव्हती. त्याच्या मागे फार मोठे षडयंत्र होतं. आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल की ते षडयंत्र काय होतं. त्यातूनच कळेल की हे सगळं का झालं. दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं," असं पूनम महाजन यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
२२ एप्रिल २००६ रोजी मुंबईतील वरळी येथे सकाळी सात वाजता प्रवीण महाजन हे प्रमोद महाजन यांच्या घरी गेले होते. प्रवीण हे प्रमोद महाजन यांच्या घरी फारसे जात नसत, पण त्या दिवशी सकाळी प्रवीण महाजन दारावर उभा होता. रेखा महाजन यांनी दरवाजा उघडल्यानंतर ते आत आले. प्रमोद महाजन सोफ्यावर बसून वर्तमानपत्र वाचत होते. नेहमीप्रमाणे ते त्ंयाच्या पांढऱ्या कुर्ता आणि पायजमात होते. त्या दिवशी सकाळी त्यांची कुणाशीही भेट नव्हती. त्यामुळे त्यांना कोणाच्या येण्याची कल्पना नव्हती. प्रवीण महाजन हे भावासमोर सोफ्याच्या सिंगल सीटवर बसले. रेखा महाजन चहा करण्यासाठी आत गेल्या.
प्रमोद महाजन यांनी प्रवीणला इथे का आलात? असे विचारले. एक दिवस आधी प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांना मेसेज केला होता. ज्यात अब न होगी याचना, न प्रार्थना, अब रण होगा, जीवन या मरण होगा, असं लिहिलं होतं. त्यावेळी प्रवीण हे सतत बोलत होते आणि प्रमोद महाजन ऐकत होते. सुमारे दहा मिनिटे प्रवीण महाजन तक्रार करत होते. यानंतर प्रमोद महाजन यांनी आपली काही तक्रार असल्यास भेटीची वेळ घेऊन या, असे सांगितले. प्रमोद महाजनांच्या या शब्दांनंतर प्रवीण महाजन यांनी पॉइंट ब्लँक रेंजमधून त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. प्रवीण महाजन यांना आणखी गोळ्या झाडायच्या होत्या, मात्र तीन गोळ्या चालवल्यानंतर त्यांची पिस्तुल जाम झाली. यानंतर प्रवीण महाजन तेथून निघून गेले.