पाच मतदारसंघांत पूनम महाजन यांना मताधिक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:29 AM2019-05-25T00:29:24+5:302019-05-25T00:29:26+5:30
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात महाजन यांना ८१ हजार ६९६ मते मिळाली तर दत्त यांना ६६ हजार १११ मतांवर समाधान मानावे लागले
खलील गिरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी १ लाख ३० हजार मताधिक्याने विजय मिळविला आहे. महाजन यांच्या या विजयात लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपैकी ५ मतदारसंघांनी मताधिक्य दिले आहे. विलेपार्ले मतदारसंघात महाजन यांना एकूण मताधिक्याच्या ५६ टक्के म्हणजे ७३ हजार २२९ मताधिक्य मिळाले आहे. त्या तुलनेत प्रिया दत्त यांना केवळ वांद्रे पूर्व या मतदारसंघात नाममात्र १२७६ मताधिक्य मिळाले आहे.
भाजपचे आमदार पराग अळवणी यांच्या विलेपार्ले मतदारसंघात महाजन यांना १ लाख २१ हजार १०७ मते मिळाली तर दत्त यांना केवळ ३८ हजार ८७८ मते मिळाली आहेत. काँग्रेसचे आमदार आरिफ नसीम खान यांच्या चांदिवली मतदारसंघात महाजन यांना १ लाख ९९८ मते मिळाली व दत्त यांना ७३ हजार ७४३ मतांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी महाजन यांना २७ हजार २५५ मताधिक्य मिळाले आहे.
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात महाजन यांना ८१ हजार ६९६ मते मिळाली तर दत्त यांना ६६ हजार १११ मतांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी महाजन यांना १५ हजार ५८५ मताधिक्य मिळाले आहे. शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कुर्ला मतदारसंघात महाजन यांना ६६ हजार ६२५ मते तर दत्त यांना ६१ हजार ३८४ मते मिळाली आहेत.
शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांच्या कलिना मतदारसंघात महाजन यांना ६५ हजार ४०० मते मिळाली तर दत्त यांना ५५ हजार ९१७ मते मिळाली. या मतदारसंघात महाजन यांना ९ हजार ४८३ मताधिक्य मिळाले आहे.