पूनम महाजन यांना नेटकऱ्यांनी फटकारले; राष्ट्रवादीनेही केला निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:09 PM2019-02-04T21:09:19+5:302019-02-04T21:14:54+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंथरा व शकुनी मामा अशी संभावना करणा-या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा, खासदार पूनम महाजन यांना नेटक-यांनी चांगलेच फटकारले.

Poonam Mahajan was trolled on social media, NCP also protested | पूनम महाजन यांना नेटकऱ्यांनी फटकारले; राष्ट्रवादीनेही केला निषेध 

पूनम महाजन यांना नेटकऱ्यांनी फटकारले; राष्ट्रवादीनेही केला निषेध 

Next
ठळक मुद्देराहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती आणि केजरीवाल यांच्यावर शाब्दिक कोटी केल्यानंतर महाजन यांनी शरद पवार यांची रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी अशी संभावना केली. या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच नेटक-यांनी पूनम महाजन यांना फटकारत त्यांची चांगलीच कानउघडणी केली.अनेक नेटक-यांनी प्रमोद महाजनही शरद पवारांना जाणता राजा म्हणायचे अशी आठवण करून दिली.

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंथरा व शकुनी मामा अशी संभावना करणा-या भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा, खासदार पूनम महाजन यांना नेटक-यांनी चांगलेच फटकारले. राजकारणातील सुसंस्कृतपणाचा जपण्याचा सल्ला देतानाच अशी टीका करण्यापूर्वी स्वत:च्या वयाचे व अनुभवाचे तरी भान बाळगा, असा सल्लाही नेटकऱ्यांनी दिला. तर, राष्ट्रवादीनेही महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. 

रविवारी, भाजयुमोच्या सीएम चषक पारितोषिक वितरण सभारंभात बोलताना पूनम महाजन यांनी महाआघाडीची खिल्ली उडवली होती. राहुल गांधी, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, मायावती आणि केजरीवाल यांच्यावर शाब्दिक कोटी केल्यानंतर महाजन यांनी शरद पवार यांची रामायणातील मंथरा आणि महाभारतातील शकुनी अशी संभावना केली.  या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच नेटक-यांनी पूनम महाजन यांना फटकारत त्यांची चांगलीच कानउघडणी केली. तर, अनेक नेटक-यांनी प्रमोद महाजनही शरद पवारांना जाणता राजा म्हणायचे अशी आठवण करून दिली. दुस-यांना शकुनी, मंथरा म्हणण्याआधी स्वत:च्या घरातील महाभारत सांभाळा असे सांगत अनेकांनी महाजन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. 

राष्ट्रवादीनेही महाजन यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. शरद पवारांनी राजकारणात जेवढी वर्षे व्यतित केली, तेवढे वयही नसलेल्या महाजन यांचे विधान हे सत्ता डोक्यात गेल्याचे लक्षण असून येत्या निवडणुकांमध्ये जनताच यांना धडा शिकवेल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. सध्या काहीतरी खळबळजनक विधान करून प्रसिद्धी मिळवण्याची भाजपा नेत्यांमध्ये चढाओढ लागली असून त्यात पूनम महाजन यांच्या नावाचीही भर पडली आहे.

राष्ट्रीय राजकारणात देशातील ज्येष्ठ नेतेही पवारांकडून राजकीय सल्ला घेतात. पूनम महाजन ज्या दिवंगत प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा सांगतात, त्यांनीही पवार साहेबांना कायमच योग्य तो मान दिला होता. प्रमोद महाजन यांची तर एक संयमी नेता अशीच ओळख होती. त्याच संयमीपणाची त्यांच्या पुढच्या पिढीकडूनही अपेक्षा आहे. आपल्या वडिलांचे अनुकरण करायचे की बेताल बडबडणा-या  भाजपा नेत्यांच्या रांगेत बसायचे हे पूनम महाजन यांनीच ठरवावे. बेताल वक्तव्यांनी प्रसिद्धीचा खटाटोप करण्याऐवजी त्यांनी खासदार म्हणून असलेली कर्तव्ये बजावावीत, असा सल्लाही अहिर यांनी दिला.

Web Title: Poonam Mahajan was trolled on social media, NCP also protested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.