उमेदवार कार्यकर्त्यांना कशा सूचना देतात, काय सूचना देतात? त्यांच्या प्रचारदौऱ्यात ते लोकांशी काय संवाद साधतात, कोणती आश्वासने सतत देतात, जनता त्यांच्याकडे काय मागणी करते, काय-काय किस्से या चर्चांदरम्यान घडतात? अशा सर्वांचा धांडोळा घेण्यासाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी खलील गिरकर यांनी उत्तर मध्य मुंबईतील भारतीय जनता पक्ष- शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, रासप महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचाराच्या एका दिवसाचे केलेले हे लाइव्ह रिपोर्टिंग...
सकाळी ९ वाजता पूनम महाजन प्रचारफेरीमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या. त्यांना भेटण्यासाठी काही प्रमुख कार्यकर्ते यावेळी त्यांच्या निवासस्थानाजवळ हजर होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधून महाजन या कलिना येथील त्यांच्या कार्यालयात काही काळ उपस्थित राहून तिथून चेंबूर येथील प्रचारफेरीसाठी रवाना झाल्या.
प्रचार फेरीत चेंबूर पेस्टम सागरमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, अविनाश महातेकर, गौतम सोनावणे उपस्थित होते. किरण शेवाळे, श्रीकांत भिसे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांंनी त्यांचे स्वागत केले. भगवे व निळे फेटे व गळ्यात भगवे, निळे उपरणे घालून, यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने हजर होत्या. महिला कार्यकर्त्यांसोबत असलेल्या लहानगीला कडेवर उचलताच अनेकांनी हे चित्र आपापल्या मोबाइलमध्ये साठवले. सजविलेल्या उघड्या जीपमधून सर्वांना महाजन व इतर नेत्यांनी अभिवादन केले.
सायंकाळी पाच वाजता महाजन पुन्हा विलेपार्ले येथील प्रचारफेरीसाठी रवाना झाल्या. या ठिकाणी जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ज्येष्ठ महिलांनी यावेळी त्यांचे स्वागत केले. महाजन यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. काही झोपडपट्टी विभागात प्रचारफेरी गेल्यावर तिथे महाजन यांनी केलेल्या शौचालयांच्या उभारणीच्या कामामुळे झोपडीतील महिलांना व मुलींना पूर्वीप्रमाणे त्रास होत नसल्याची भावना काही महिलांनी व्यक्त केली व त्याबाबत महाजन यांचे आभार मानले. महाजन पुन्हा निवडून याव्यात, म्हणजे मतदारसंघात अधिक चांगले काम होऊ शकेल, असा विश्वास अनेकांनी यावेळी व्यक्त केला.
चांदिवलीतील म्हाडा कॉलनीतील शांती कॉम्प्लेक्स, अशोक टॉवर, ओम सोसायटी परिसरात महाजन यांनी प्रचार फेरीत सहभाग घेतला व नागरिकांशी संवाद साधला.
देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने कणखर व विकास करणारा पंतप्रधान मिळाला आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी पूर्ण ताकदीने उभे राहण्याची गरज आहे. उत्तर मध्य मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे गेल्या पाच वर्षांत सोडविली आहेत. यापुढील काळातदेखील पब्लिक पॉलिटिशियन पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेल राबविण्यात येईल व मतदारांना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहयोगातून मतदारसंघातील विविध विकासकामे करण्यात येतील, अशी ग्वाही महाजन यांनी मतदारांना दिली. मतदारांनी त्यांच्या या वक्तव्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
खासदार म्हणून काम करताना मतदारसंघातील विविध समाजघटकांना नेहमी विश्वासात घेऊन काम केले आहे. यावेळीदेखील विजयी झाल्यानंतर उर्वरित समस्या त्वरित सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.- पूनम महाजन