Join us

"गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 2:27 PM

आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले.

मुंबई - खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा या मोठे आर्थिक व्यवहार करणार्‍या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे या नोटा नव्हत्या. गेली दोन वर्षे तर बँकेतदेखील या नोटा मिळत नव्हत्या. मग दोन हजाराच्या नोटा छापून काळा पैसा बाहेर काढायचा होता तर ज्यांनी काळा पैसा साठवला आहे. तो बाहेर पडण्याकरता सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते असा थेट हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रसरकारवर पत्रकार परिषदेत केला. तसेच, गरिबांकडे २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग नोटा बदलण्यासाठी ४ महिन्यांचा कालवधी म्हणजे खूप होतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

अजित पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. त्यात, ईडीची नोटीस, महाविकास आघाडी, जागावाटप, नवाब मलिक, समीर वानखेडे, नोटबंदी, शेतकरी, महागाई यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केलं. तर, २ हजार रुपयांची नोट बंद करण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी का दिला, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. 

आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले. असे आकडे ऐकले तर नोटबंदी करायचं कारण काय असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. १९ मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेत असताना ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा चालतील असे सांगण्यात आले. खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा मोठे आर्थिक व्यवहार करणारे लोकांकडे असतात सर्वसामान्य गरीब लोकांकडे नाहीत. मग, ३० सप्टेंबरपर्यंत मुदत कशासाठी देण्यात आली, ती देण्याचं काही कारण नव्हतं, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे म्हटले.  

पाचशे आणि हजार रुपयांची नोट पंतप्रधानांनी ज्यादिवशी बंद करण्याचे जाहीर केले त्याच्या दुसर्‍या दिवशीच त्या नोटा कागदाचा तुकडा झाला. त्याचपध्दतीने करता आले असते आणि त्यातून काळा पैसा हा चलनामध्ये फिरतोय तो फिरण्यापासून वाचवता आला असता. नोटबंदीच्यावेळी रांगेत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र, शंका म्हणून दोन हजारची नोट त्याचदिवशी बंद करायला हवी होती. चार महिने देणे म्हणजे कमी दिवस नाहीत असे स्पष्ट मत अजित पवार यांनी मांडले.

टॅग्स :अजित पवारनिश्चलनीकरणमहाविकास आघाडीभाजपा