पावसामुळे राष्ट्रीय उद्यानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:30+5:302021-07-20T04:06:30+5:30
मुंबई : शनिवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाचा बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय ...
मुंबई : शनिवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसाचा बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालाही फटका बसला. राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीलादेखील पूर आला आहे. या पावसामुळे राष्ट्रीय उद्यानातील कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी भरले आहे. गेल्या काही वर्षांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानातही पाणी साचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या काही वर्षांतील ही चौथी घटना आहे. रात्रीच्या पावसामुळे उद्यानातील रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नाले, रस्ते व ओढे पावसाच्या पाण्याने ओसंडून वाहू लागल्याने रस्त्यांवरील डांबर निघून बाहेर आले आहे, तर पूलदेखील तुटून कोसळले आहेत. पावसाच्या रुद्र रूपामुळे राष्ट्रीय उद्यानातील प्राणीदेखील घाबरले आहेत.
राष्ट्रीय उद्यानातील संचालकांच्या कार्यालयातील काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे देखील भिजून खराब झाली. उद्यानातील परिसर जलमय झाल्याने तेथील नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरातदेखील पाणी साचले. यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने या पावसात उद्यानात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचप्रमाणे सर्व प्राणी व त्यांचे पिंजरे सुरक्षित स्थितीत असल्याचे उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी सांगितले.
उद्यानासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मोठी आर्थिक तरतूद केली होती. मात्र या पैशांचा वापर न झाल्याने ते अनुदान परत गेले. तत्कालीन संचालक विकास गुप्ता यांनी कार्यालयाच्या डागडुजी ऐवजी रेस्ट हाऊस च्या डागडुजीसाठी एक कोटी रुपये अनावश्यक खर्च केला. यामुळे आता अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. अशा अधिकार्यांवर सरकारने कारवाई करायला हवी अशी मागणी कन्झर्व्हेशन ॲक्शन ट्रस्टचे प्रमुख ट्रस्टी देबी गोएंका यांनी केली आहे.