मुंबई : पावसाळा शेवटच्या टप्प्यात आला असला तरीदेखील मुंबईकरांचा खड्ड्यांचा त्रास काही केल्या कमी होत नाही. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या शिवडी चेंबूर मार्गावरील प्रियदर्शनी येथील स्वामीनारायण उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या पुलावरून दररोज हजारो वाहने जात असतात. प्रशासनाचे या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे. उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या पुलांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती.
खड्ड्यांची संख्या वाढली असल्याने दररोज खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे अपघात होत आहेत. खड्ड्यांमधून बाहेर आलेल्या रेतीमुळे दुचाकीस्वारांचे घसरुन मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.
स्वामीनारायण उड्डाणपूल हा शिवडी चेंबूर जोड रस्त्यावरून पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडला जातो. येथून अवजड वाहनांचीदेखील वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. या उड्डाणपुलावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.