Join us

कामराज नगर येथील संक्रमण शिबिराची दुरवस्था, रहिवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:58 AM

मागील सात वर्षांपासून येथील रहिवासी आपल्या हक्काचा घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विकासकाने येथील रहिवाशांचे मागील दोन वर्षांपासून भाडे थकविले आहे

मुंबई : घाटकोपर पूर्वच्या कामराज नगर येथील संक्रमण शिबिराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे संक्रमण शिबिरातील रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २०१३मध्ये कामराज नगरमध्ये एसआरए योजना राबविण्यासाठी विकासकाने रहिवाशांना घरे रिकामी करून ७ मजली संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले. मात्र या संक्रमण शिबिराची देखभाल न झाल्याने यातील लिफ्ट मागील आठ महिन्यांपासून बंद पडली आहे. तसेच रहिवाशांसाठी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बाजूने सांडपाणी आणि शौचालयाचे सांडपाणी वाहत आहे. रात्रीच्या वेळेस शिबिराच्या मागे दारुडे व गर्दुल्ले हैदोस घालत असल्याने संत नामदेव गृहनिर्माण संस्थेतील राहिवासी त्रस्त झाले आहेत.

मागील सात वर्षांपासून येथील रहिवासी आपल्या हक्काचा घरांच्या प्रतीक्षेत आहेत. विकासकाने येथील रहिवाशांचे मागील दोन वर्षांपासून भाडे थकविले आहे. त्याचप्रमाणे मागील अनेक महिन्यांपासून एसआरए इमारतीचे बांधकामही थांबविले आहे. याप्रकरणी स्थानिक नगरसेवक परमेश्वर कदम यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देत रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी विनंती केली आहे. तसेच या समस्यांची वेळीच दखल न घेतल्यास रहिवाशांच्या वतीने उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :मुंबई