गरिबांना मधुमेह, कर्करोगाचा अधिक धोका

By admin | Published: July 22, 2015 02:22 AM2015-07-22T02:22:16+5:302015-07-22T02:22:16+5:30

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे ६० टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी महापालिका विविध उपाययोजना

Poor diabetes, high risk of cancer | गरिबांना मधुमेह, कर्करोगाचा अधिक धोका

गरिबांना मधुमेह, कर्करोगाचा अधिक धोका

Next

मुंबई : शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे ६० टक्के आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी महापालिका विविध उपाययोजना आखत असली तरी प्रत्यक्षात गोरगरीब नागरिकच अधिक आजारांच्या विळख्यात असल्याचे चित्र प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या आरोग्य अहवालात स्पष्टपणे दिसून आले. दारिद्र्यरेषेखालील हजार घरांमागे ७५ जणांना मधुमेह असल्याचे आढळले आहे. २०१३ मध्ये हे प्रमाण ४५ इतके होते.
गेल्या दोन वर्षांत दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, मधुमेह, कर्करोगासारख्या आजाराचे प्रमाण या गटांमध्ये वाढते आहे. मलेरिया रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. २०१३ मध्ये एक हजार घरांमागे ४४ मलेरियाचे रुग्ण आढळून येत होते. हे प्रमाण २०१५ मध्ये ७५ इतके झाले आहे. २०१४ मध्ये ही सरासरी ७७ इतकी होती. डेंग्यूचे रुग्ण आणि कर्करोगग्रस्तांचेही प्रमाण वाढत आहे. २०१३ मध्ये हजार घरांमागे ७ कर्करुग्ण आढळत होते. २०१५ मध्ये हा आकडा १२ वर पोहोचला आहे.
प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांच्या म्हणण्यानुसार, महापालिका गरिबांच्या आरोग्यासाठी पैसा खर्च करते, असे दाखवते. प्रत्यक्षात असे दिसत नाही. मुंबईतील गरीब जनतेच्या आरोग्याचा विचार अधिक गांभीर्याने व्हायला हवा.
पालिकेचा दावा हवेतच!
प्रजा फाउंडेशनने २०१३ आणि २०१४ मध्ये काढलेल्या अहवालात टीबीच्या मृतांची संख्या जास्त असल्याचे स्पष्ट केले होते. यावर महापालिकेने टीबीमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा इतका मोठा आहे का, याची तपासणी करू. घरी जाऊन मुलाखती घेऊन इतर कागदपत्रे तपासून मृतांचा आकड्याची नोंदणी करण्यात येईल, असे महापालिकेने सांगितले होते. गेल्या एका वर्षात महापालिका शोध घेणार होती. पण त्यांनी शोध घेतला नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले. फाउंडेशनने टाकलेल्या माहिती अधिकारात त्यांना असे उत्तर मिळाले की, तपासणी केली जाणार होती. पण त्याची सुरुवातच केली नाही, यामुळे अहवाल तयार नाही.
मुंबईतील राहणीमान, जीवनशैली यामुळे अनेक जण टीबी या आजाराला बळी पडतात. मुंबईत टीबीच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असली तरीही मृत्युदरात घट झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पाच टीबी रुग्णांपैकी एकाचा मृत्यू होत होता. २०१४ - २०१५ मध्ये हे प्रमाण सात टीबी रुग्णांमागे एकाचा मृत्यू होतो असे झाले आहे. टीबी रुग्णांच्या मृत्युदरात घट झाल्याचे प्रजा फाउंडेशनने तयार केलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

टीबी रुग्णांच्या मृतांची संख्या महापालिका सादर करते. त्यापेक्षा अधिक मुंबईकर हे टीबीमुळे मृत्युमुखी पडतात, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०१३ मध्ये महापालिकेच्या आकडेवारीनुसार टीबीमुळे १ हजार ३९३ जणांचा मृत्यू झाला होता. पण आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार मृतांचा आकडा ७ हजार ३७२ इतका होता. २०१४ मध्ये महापालिकेने जाहीर केलेल्या टीबी झालेल्या मृतांची संख्या १ हजार ३५१ इतकी होती. तर प्रत्यक्षात ६ हजार ५८९ इतक्या टीबी रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी मृत्यूदर कमी झालेला आहे.

Web Title: Poor diabetes, high risk of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.