- सचिन लुंगसेमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे किंवा अयोग्य विद्युत जोडणीमुळे आगी लागतात, असे निदर्शनास आले आहे. आगीच्या घटनांमध्ये बहुतांश वेळी निकृष्ट दर्जाचे विद्युत वायरिंग, फिटिंग कारणीभूत असते. ही बाब लक्षात घेता विद्युत जोडणीची दाब क्षमता, विद्युत उपकरणे, विद्युत खटके (बटन / स्विच), वायरिंग याबद्दल सजग असणे अतिशय गरजेचे आहे. सर्व व्यावसायिकांनी आणि संबंधितांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी विद्युत उपकरणांनुसार किती क्षमतेचा विद्युतप्रवाह (वीजदाब) लागेल? याची तपासणी करूनच त्यानुसार विद्युत वितरण कंपनीकडून जोडणी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले.कारखाने असाेत किंवा घर, पुरेशी काळजी न घेतल्याने आगीच्या घटना घडतात. यात अनेकांचे नाहक बळी जातात. त्यामुळे सर्व विद्युत खटके (बटन / स्विच), वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी हे वीजदाब क्षमतेला अनुरूप व आय.एस.आय. प्रमाणित असावेत. त्यांची जोडणी, फिटिंग इत्यादी कुशल व अधिकृत तंत्रज्ञांकडूनच करून घ्यावी, असे पालिकेने स्पष्ट केले.जेथून विद्युत जोडणी आपल्या परिसरात येते, तेथे मेन स्विचसह एम.सी.बी. / इ.एल.सी.बी. तंत्रज्ञांच्या सल्ल्यानुसार बसवून घ्यावेत. या उपकरणांमध्ये शॉर्टसर्किट झाल्यास किंवा शॉक बसल्यास विद्युत प्रवाह आपोआप खंडित होण्याची व्यवस्था असते. कोणतेही नवीन विद्युत उपकरण घेताना ते आपल्या विद्युत जोडणीच्या दाब क्षमतेला अनुरूप आहे किंवा नाही याची खातरजमा करूनच घ्यावे. ते अधिक दाब क्षमतेचे असल्यास विद्युत जोडणी तेवढ्या दाब क्षमतेची करून घेण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला कळवावे. दाब क्षमता वाढविण्यात आल्यानंतरच सदर उपकरणाचा वापर करावा....तरच घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्यविद्युत उपकरणे, विद्युत वायरिंग, विद्युत खटके, मेन स्विच, एम.सी.बी. / इ.एल.सी.बी. इत्यादींची तंत्राज्ञांकडून नियमित तपासणी, आवश्यक तेथे वेळोवेळी गरजेनुसार तातडीने सुधारणा करून घ्यावी. ज्या खाेलीत अन्न किंवा पदार्थ तयार केले जातात, तेथे गॅस, लाकूड इत्यादी इंधन प्रकारानुसार तापमान कमी, जास्त असू शकते. हे लक्षात घेऊन त्या खोलीतील वायरिंग, विद्युत खटके, विद्युत उपकरणे इत्यादींची तपासणी संबंधित तंत्रज्ञांकडून स्वतंत्रपणे व नियमित करावी. तरच आगीसारख्या घटनांवर नियंत्रण मिळवता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
निकृष्ट दर्जाचे विद्युत वायरिंग, फिटिंग ठरते धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 2:21 AM