मुंबई - पालघर पूर्व भागातील वेवूर येथील सोनाली विष्णू धामोडा (वय २७) या तरुणीला सर्पदंश झाल्यानंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांकडून सोनाली धामोडा उपचारांत हयगय झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांनी आरोप फेटाळला आहे. जिल्ह्यात आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला असून, त्यातून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याप्रकरणी आता विधानपरिषदेत आमदार सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेची दूरावस्था झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
दर्जेदार आरोग्य सेवा असा दावा करणाऱ्या राज्याच्या आरोग्य विभागाचे डोळे कधी उघडतील, असा सवाल करण्याची वेळ गेल्या दोन दिवसांत सर्पदंशांच्या घटनेमुळे जीव गमावलेल्या प्रसंगांमुळे आली आहे. पेण तालुक्यातील एका बारा वर्षांच्या मुलीला सर्पदंश झाल्यानंतर मंगळवारी रात्रभर चार रुग्णालयांचे उंबरठे झिजवले, तरी उपचार न मिळाल्याने अखेर तिचा यात मृत्यू झाला आहे. सारा रमेश ठाकूर असे त्या मृत मुलीचे नाव आहे. तर, पालघरमध्येही २७ वर्षीय महिलेचा साप चावल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी आज अधिवेशादरम्यान, आमदार सुनिल शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला.
डॉक्टर वेळेवर आलेच नसल्याचा आरोप
पालघर पूर्व येथे राहणाऱ्या सोनाली हिला गुरुवारी मध्यरात्री झोपेत मण्यार जातीच्या विषारी सर्पाने दंश केल्याने तिला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने कंपाउंडरने मोबाइलवरून संपर्क साधल्यावर कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेले डॉक्टर पराकुष दांडेकर अर्ध्या तासाने तेथे आले. यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले, असं वैद्यकीय अधिक्षक दांडेकर यांनी सांगितले. यानंतर डॉ. दांडेकर यांनी एक इंजेक्शन दिले आणि तासभर कोणच आले नाही, असं नातेवाईकांनी सांगितले. तिला अगोदर टीबीचा त्रास होता. त्यामुळे कुठेही साप चावल्याचा व्रण दिसून आला नाही त्यामुळे साप चावल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शन दिले नव्हते. पण तासाभरानंतर तिने उलटी केल्याची सांगितल्यानंतर सर्वांची धावपळ उडाली. तिला उपचारादरम्यान एकूण १७ इंजेक्शन दिल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षिका दीप्ती गायकवाड यांनी 'लोकमत'ला दिली.