मुंबई : इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गॅस दरवाढीमुळेदेखील सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आले आहेत. घरखर्च भागवताना गॅसवर होत असलेल्या वाढीव खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा, असा यक्षप्रश्न गृहिणींना पडला आहे. घरगुती गॅसच्या किमती पावणे आठशे रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. यात घट होण्याची शक्यता फार कमीच आहे. गॅसच्या दरात झालेल्या दरवाढीने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा फटके आणि चटके दिले आहेत.
नुकताच केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, अशी आशा अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात मात्र अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांची घोर निराशा केली. इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वांना बसत असून त्याचा परिणाम इतर घटकांवरदेखील होत आहे. इंधनाचे दर वाढल्याने साहजिकच त्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक घटकाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. इंधनाच्या दरात वाढ होत असतानाच आता गॅसच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. सिलिंडरसाठी पावणेआठशे रुपये मोजावे लागत असून, हे पैसे बाजूला करताना, घर चालविताना गृहिणींची तारेवरची कसरत होत आहे. मुळात महागाईची झळ सर्वांनाच बसत आहे. महागाई कमी करण्यात यावी यासाठी राष्ट्रीय पक्ष असो वा सामाजिक सेवाभावी संस्था असोत यांनी कित्येक वेळा आवाज उठविला आहे. प्रत्यक्षात मात्र या सगळ्यांना गॅसच्या दरात झालेल्या वाढीने चांगले चटके दिले आहेत.
----------------------------
कोणते कार्ड आहे; त्याने काय फरक पडतो?
मुंबई शहर आणि उपनगरात वास्तव्य करताना, घरखर्च भागवताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. रेशनच्या दुकानावर गहू, तांदूळ, रॉकेल असे साहित्य मिळते, असे सांगितले जात असले तरी हे नावापुरते आहे किंवा नाममात्र आहे. प्रत्यक्षात हे साहित्य रेशन दुकानावर येईपर्यंत ते विकले गेलेले असते किंवा त्याचा काळा बाजार झालेला असतो आणि जरी ते ग्राहकाला मिळाले तरी ते निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे ते सेवन करता येत नाही. मुळात तुमच्याकडे रेशन कार्ड कोणते आहे याने काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जे रेशन कार्ड मिळाले आहे त्यावर रेशनच्या दुकानात तुम्हाला साहित्य मिळते का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. रेशनच्या दुकानावर कधीच पुरेसे रेशन मिळत नाही. अनेक वेळा येथे दाखल झालेल्या साहित्याचा काळाबाजार केला जातो, अशी माहिती मालाड येथे शिधापत्रिकासंबंधी विषयावर काम करीत असलेले सामाजिक कार्यकर्ते विनोद घोलप यांनी दिली.
----------------------------
दराचा आढावा
गॅसच्या किमती सातत्याने वाढत आहेत. एके काळी गॅस साडेचारशे ते पाचशे रुपयांपर्यंत येत होता. तेव्हा नागरिकांना सिलिंडर केवळ एकच दिला जात होता. त्यानंतर आणखी एक असे दोन सिलिंडर देण्यात आले. नागरिकांची गैरसोय दूर झाली. सिलिंडरच्या किमती साडेचारशे पासून पावणेआठशे रुपये एवढी झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत सिलिंडरच्या किमतीने मोठा आकडा गाठला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
----------------------------
बाकीचे खर्चदेखील आहेत
गॅसच्या किमती वाढल्यामुळे घर चालविणे फार कठीण झाले आहे. खर्चाचा ताळमेळ बसत नाही. सिलिंडरचाच खर्च आहे असे नाही, घर चालविताना बाकीचे खर्चदेखील आहेत. सिलिंडरसाठी जर आठशे रुपये गेले तर बाकीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्नच आहे.
- प्रतीक्षा गीते
----------------------------
विनंती मायबाप सरकारला
राज्य असो किंवा केंद्र. दोघांनी कायम आणि सातत्याने नागरिकांचा विचार केला पाहिजे. कारण दरवाढीची झळ प्रत्येकाला बसत आहे. इंधन असो किंवा सिलिंडर असो. प्रत्येक घटकाचा प्रत्येक घटकावर परिणाम होत असतो. घर चालविण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, अशा गोष्टी महाग करू नयेत एवढीच विनंती या मायबाप सरकारला आहे.
- प्राजक्ता मोहिते
--------------------------
प्रत्येक दिवस दरवाढीचा
रेशन दुकानांवर काही मिळत नाही आणि मिळाले तरी त्याचा दर्जा नीट नसतो. प्रत्येक दिवस जर असा दरवाढीचा असेल तर सर्वसामान्य माणूस कसा जगू शकेल? सरकारने याचा थोडा तरी विचार केला पाहिजे.
- मेनका सूनके
--------------------------
काळजी घ्या
गॅस सिलिंडरची किंमत कायम स्थिर राहील, असे काही तरी सरकारने केले पाहिजे. योजना कोणतीही असो. योजना सुरू झाली की दिलासा मिळतो. मात्र काही काळानंतर पुन्हा अडचणी येतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर त्या गोष्टी जातात. निदान गॅसच्या किमती वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- मीनाक्षी बारामती
--------------------------