Join us

एका गरीब चित्रकाराची भेट; दीड वर्षाची प्रतीक्षा... आणि अविस्मरणीय ठरलेली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 10:13 AM

एक गरीब चित्रकार आणि एक बलाढ्य उद्योजक यांच्यातील भेदाची कथित भिंतच पाडून टाकते...   

सिद्धार्थ ताराबाई, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कफ परेडच्या मच्छीमारनगर झोपडपट्टीतील दहा बाय दहाच्या झोपडीत राहणारा एक गरीब; पण स्वयंभू चित्रकार रतन टाटांना भेटण्याचे स्वप्न पाहतो. त्यासाठी त्यांच्या बंगल्याबाहेर उभा राहतो... त्याला टाटांना एकदाच भेटायचं असतं... आणि त्यानं साकारलेलं त्यांचं एक पेंटिंग त्यांना भेट द्यायचं असतं; पण एक सामान्य तरुण आणि एक दिग्गज उद्योगपती यांच्यातील ही भेट घडते मात्र दीड वर्षाने. ही भेट एक गरीब चित्रकार आणि एक बलाढ्य उद्योजक यांच्यातील भेदाची कथित भिंतच पाडून टाकते...   

टाटांचा कनवाळूपणा, त्यांचं औदार्य, त्यांच्यातला पराकोटीचा साधेपणा या आणि अशा कितीतरी गुणवैशिष्ट्यांमुळे प्रभावित झालेल्या, त्यांच्याप्रति कृतज्ञता बाळगणाऱ्या असंख्य लोकांपैकीच नीलेश मोहिते हा तरुण चित्रकार. चित्रकलेच्या कोणत्याही शाळेत न गेलेल्या नीलेशची चित्रं पाहिल्यावर ‘नीलेश यू आर ए ग्रेट आर्टिस्ट’ हे टाटांनी काढलेले कौतुकोद्गार त्याने हृदयात कोरून ठेवले आहेत. “कुलाब्यात घर घे, असे म्हणत टाटांनी त्याच्या हाती ठेवलेला बंद लिफाफा त्यांच्या पायावर डोकं ठेवून परत करणारा एक सच्चा कलावंत आणि त्याला चित्रप्रदर्शनासाठी ‘ताज’ची आर्ट गॅलरी देणारा एक दिलदार उद्योजक यांच्यातील ती भेट ग्रेटच होती. 

टाटांच्या पहिल्या भेटीबद्दल नीलेश म्हणाला, “मी भेटीचे प्रयत्न करीत होतो; पण एवढा मोठा उद्योगपती मला वेळ देईल का? असा प्रश्न होता. माझं धाडस होत नव्हतं; परंतु दादा पौड या व्यावसायिकांच्या माध्यमातून मी टाटांच्या वाढदिवशी त्यांना त्यांचं पेंटिंग दिलं. ‘टिटो’ आणि ‘टँगो’ या त्यांच्या दोन श्वानांना ते खेळवत आहेत, असं ते पोट्रेट होतं. त्यानंतर त्यांच्या पुढच्या वाढदिवसाला मी त्याचं आणखी एक पेंटिंग भेट दिलं. त्यावेळी त्यांच्याशी बोलणं सुरू असताना मी सहज बोलून गेलो की, सर हे पेंटिंग करताना मला त्रास झाला. तर त्यांनी विचारलं काय प्रॉब्लेम आहे? मी जागेची अडचण त्यांना सांगितली. त्यांनी मग आस्थेने माझी चौकशी केली. मी काय करतो? कुठे राहतो? कुटुंबात कोण-कोण आहेत? संपूर्ण माहिती घेतल्यानंतर ते मला म्हणाले, नीलेश तू उद्या मला भेट.” 

टाटांनी आपल्याला पुन्हा कशाला भेटायला बोलावलं, याची उत्सुकता नीलेशला होती; पण ती भेट अर्थातच झाली नाही.  नीलेश म्हणाला, “चार दिवसांनंतर त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलावलं. समोर बसवलं आणि एक बंद लिफाफा देत मला म्हणाले, नीलेश हे ठेव आणि यातून तू कुलाब्यातच मोठं घर घे. तुझी अडचण दूर होईल, तुला पेंटिंगसाठी पुरेशी जागा मिळेल. त्या लिफाफ्यात बहुतेक चेक असावा; पण मी तो लिफाफा उघडूनही पाहिला नाही. मी तत्काळ त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि नम्रपणे तो लिफाफा त्यांना परत केला आणि म्हणलो, सर मला पैसे नकोत. मी तुम्हाला तुमचं जे पेंटिंग दिलं ते तुमचं बर्थ डे गिफ्ट होतं. मला काही देऊ इच्छित असाल तर माझ्या हाताला काम द्या. त्यावर ते म्हणाले, आता तरी तुझ्यासाठी माझ्याकडे काही काम नाही; पण नंतर विचार करू. ते परत आल्यानंतर ‘कोविड’चे लॉकडाऊन लागले. 

नीलेश म्हणाला, “लॉकडाऊन उठल्यानंतर मी टाटांना भेटलो तर ते म्हणाले नीलेश तुला द्यावं असं काम तर माझ्याकडे नाही; पण तुझ्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यासाठी मी तुला ‘ताज’ची आर्ट गॅलरी मोफत देतो. तू तुझी चित्रं तयार ठेव. माझ्या चित्रांचे प्रदर्शन ‘ताज’मध्ये भरले; परंतु ते पाहण्यासाठी सरांना वेळ मिळाला नाही, याचे दु:ख मला वाटते.” 

टाटा परिवाराचा मी दोन दशकांपासून सदस्य आहे. सुसंस्कृत, द्रष्टा, दानशूर अशी कितीतरी विशेषणे टाटा यांच्या नावापुढे लावता येतील. रतन टाटा हा सच्चा माणूस आहे आणि म्हणून टाटा समूहसुद्धा तसा आहे, असे गौरवोद्गार ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी  काढले होते. या थोर माणसाबद्दल एवढेच म्हणेन की... लिजंड्स नेव्हर डाय... - मिलिंद उपासनी, डेप्युटी जनरल मॅनेजर, टाटा मोटर्स 

ते आमच्यासोबत जेवायचे 

रतन टाटा पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्लॅण्टमध्ये आले की कायमच कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकूण घेत. तसेच कामगारांसोबतच जेवण करत. कामगारांना सोयी-सुविधा मिळाव्यात, ते सुखी राहावेत याकडे ते कायम लक्ष देत. उद्योगपती म्हणून केवळ पैसे कमावणे हा त्यांचा उद्देश नव्हता. ते लोकांना कायमच मदतीसाठी तत्पर असत. - श्रीराम परदेशी, कर्मचारी, टाटा मोटर्स

 

टॅग्स :रतन टाटाटाटा