पोलिसांच्या पार्किंगविषयक प्रस्तावाला पालिकेचा खोडा
By admin | Published: November 19, 2014 02:19 AM2014-11-19T02:19:44+5:302014-11-19T02:19:44+5:30
मुंबईतील वाढत्या रहदारी आणि पार्किंगविषयक समस्यांवर उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने तयार केलेल्या प्रस्तावाकडे बृहन्मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
डिप्पी वांकाणी, मुंबई
मुंबईतील वाढत्या रहदारी आणि पार्किंगविषयक समस्यांवर उपाय म्हणून मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने तयार केलेल्या प्रस्तावाकडे बृहन्मुंबई महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ५० हजार चारचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था होऊ शकेल असा हा प्रस्ताव आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलीस सहआयुक्त बी.के. उपाध्याय यांनी आॅक्टोबर महिन्यात त्यासंबंधी पालिका आयुक्तांना पत्र पाठवले होते. मात्र पालिकेने अद्याप त्याला साधे उत्तरही पाठविलेले नाही.
या पत्रात उपाध्याय यांनी १९९१पासून वाहनांची संख्या कशी वाढत गेली, रहदारीचे नियोजन कसे कोलमडले आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील, हे सुचवले आहे. त्यांनी सांगितले की, दररोज सरासरी ४५० नव्या वाहनांची नोंद होते. याशिवाय दीड लाख वाहने बाहेरून येतात. १९९१ साली वाहनांची संख्या ६.२८ लाख होती. ती २००१ साली १०.२९ लाखांवर तर २०११मध्ये १९.३८ लाखांवर गेली. जुलै २०१३ अखेर शहरात २२.६३ लाख वाहने होती. म्हणजेच गेल्या २० वर्षांत वाहनसंख्येत २०८ पटीने वाढ झाली आहे. याउलट रस्ते विस्तारलेले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. पुढील पाच वर्षांत परिस्थिती बिकट होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावर उपाय म्हणून विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था कशी असावी, याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार दक्षिण, पश्चिम मुंबईत १५ हजार वाहनांसाठी तर पूर्व आणि उत्तर विभागात प्रत्येकी १० हजार वाहनांसाठी जागा बनवता येईल. त्यात पालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर खास पार्किंगसाठी बहुमजली इमारती आणि उद्यानांखाली जमिनींतर्गत (अंडरग्राउंड) पार्किंग स्लॉट्स बांधणे, असे उपाय सुचवले आहेत. मात्र या प्रस्तावास पालिकेकडून उत्तर आलेले नाही.