Join us

गरीब आदिवासी कुटुंबातून IAS पर्यंत भरारी, आता होणार नंदुरबारचे जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 8:21 PM

सन 2012 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले राजेंद्र भारूड यांचा स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आलं आहे.

ठळक मुद्देदोन वर्षापुर्वी डॉ. भारूड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला.धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे.

मुंबई : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचेजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासीबहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे. आदिवासींचे जीवन जगलेल्या या गरिब कुटुंबीतून IAS पर्यंत भरारी घेतलेल्या मुलास आता आदिवासींच्या कल्याणासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. 

सन 2012 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेले राजेंद्र भारूड यांचा स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास आलं आहे. 'मी एक स्वप्न पाहिलं' या पुस्तकात लहानपणी कलेक्टर बनण्याचं स्वप्न गरीब भिल्ल समाजातील राजेंद्र गारूड यांनी पाहिल्याचं आपण वाचलं असेलच. आता, नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी बढतीपर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. पाठिवर बिऱ्हाड घेऊन गोवो-गावी भटकणाऱ्या भिल्ल समाजातील भारूड यांचे कुटुंब सामोड्यात स्थिरावले. त्यामुळे स्वत:च्या कुटुंबासह आजुबाजूला असणाऱ्या आदिवासी समाजाचं जगणं राजेंद्र यांनी जवळून अनुभवलंय. आदिवीसींच्या कुटुंबातच त्यांचं बालपण गेलंय. त्यामुळे आता नंदूरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्याचं प्रशासकीय नेतृत्व करण्याच भाग्य त्यांना त्यांच्या कर्तृत्वान मिळवून दिलंय. नक्कीच, राजेंद्र भारूड यांची नंदूरबारच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती ही नंदूरबारमधील आदिवीसींना ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरेल.

 दरम्यान, दोन वर्षापुर्वी डॉ. भारूड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला. शासनाच्या अनेक योजना त्यांनी जलदगतीने राबविल्या़ प्रधानमंत्री घरकुल योजनेचे काम राज्यात अग्रेसर ठेवले. गटारमुक्त गाव करण्यासाठी शोषखड्डे घेण्याचा पथदर्शी प्रकल्प त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राबविला़ या प्रकल्पाची केंद्रस्तरावरून दखल घेण्यात आली होती. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य व महिला बालकल्याण विभागातील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबविले. आषाढी वारीतील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम कौतुकास्पद ठरला़ यासाठी त्यांना नाशिक येथील कुंभमेळाव्याच्या अभ्यासासाठी निवड झाली होती. भारूड यांच्या बदलीमुळे आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोण येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :सोलापूरजिल्हाधिकारीनंदुरबार