भातसानगर : मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणातील पाणीपातळी घटली आहे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात भातसामधील पाण्याची जी पातळी होती, ती पातळी यंदा फेब्रुवारीतच गाठली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.गेल्या वर्षीपेक्षा यंदा तालुक्यात अधिक पाऊस पडला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी तालुक्यातील तीनही धरणे लवकरच भरून वाहिली. त्यात लवकर न भरणारे भातसा धरणही भरून वाहिले. त्यासाठी तीन वेळा त्याचे दरवाजे उघडावे लागले होते. त्यामुळे धरणात अधिक पाणीसाठा राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, यंदा फेब्रुवारीतच पाणीपातळी घसरली. आणखी काही दिवसांत ती अजून घसरण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट वाढणार आहे. आजमितीस भातसा धरणात १२९.३२ मीटर इतका पाणीसाठा असून गेल्या वर्षी तो १२९.४६ मीटर इतका होता.गेल्या वर्षी भातसा धरण क्षेत्रात दोन हजार ५२५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यामानाने यंदा तीन हजार ४०७ मिमी इतका पाऊस पडला. तरीही, आज गेल्या वर्षीपेक्षा पाण्याने अधिक खोली गाठली आहे. रब्बी पिकांना पाणी दिल्यामुळे पातळी कमी झाली.
भातसातील पाणीसाठा होतोय झपाट्याने कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:14 AM