Join us

बंदी उठल्याने पीओपी मूर्ती तेजीत; बुकिंगमध्ये अचानक वाढ, मंडळांनीही सोडला सुटकेचा नि:श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:08 AM

गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. पीओपी मूर्तींची आयात मुंबईत यंदाही केली आहे.

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. पीओपी मूर्तींची आयात मुंबईत यंदाही केली आहे. अनेक मंडळांनी तर या मूर्तींचे बुकिंगही केले आहे. पीओपी मूर्तींवरी बंदीमुळे मूर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता पीओपी मूर्तींवरील बंदी उठवल्याने मूर्तीकारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे तर या मूर्तींचे बुकींग लागलीच वाढू लागल्याचे चित्र आहे.

१९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जवळपास १०० ते १५० कार्यशाळा आहेत. येथे पीओपी मूर्ती डायद्वारे बनवल्या जातात किंवा बाहेरील विकल्या जातात. घरगुती गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन लाखांहून अधिक मूर्तींची गरज असते. मुंबईत ६० ते ७० हजार गणेशमूर्ती बनवण्यात येतात. पेण, पनवेल या ठिकाणांहून मुंबईत दरवर्षी गणेशोत्सवात दीड लाख पीओपीच्या मूर्तीं येतात.

मोफत जागा, मोफत माती

पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने मूर्तिकारांना नियम बनविले आहेत. त्यामध्ये घरगुती गणेशमूर्ती २ ते ४ फूट उंच असावी. शाडूच्या मातीची असावी. शिवाय शाडूची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना जागा आणि माती प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मोफत पुरवली जाणार आहे.

पीओपीच्या मूर्ती घातक कशा?

 २५० ते ३०० डिग्री फॅरेनहाइट तापमानात जिप्सम गरम करून प्लास्टर ऑफ पॅरिस तयार केले जाते. पीओपीमध्ये कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट नावाचा विषारी घटक असतो.  पीओपीचा संपूर्ण नाश होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. या पीओपीमुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.  त्यामुळे नदी अथवा समुद्रातील मासे मरतात. इतकेच नव्हे तर इतर जलचरांनाही त्याचा धोका पोहोचतो.