विक्रमगड : संपूर्ण राज्यातील तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेल्याने सर्व सामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत़. याआधी म्हणजेच गेल्या आठवडयात संपूर्ण राज्यभरासह प्रत्येक तालुका निहाय तलाठी व मंडळ अधिका-यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते़ परंतु या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नाइलाजास्तव तलाठी आणि मंडळ अधिकारी आता बेमुदत संपावर गेले असून गुरूवारी संपाचा दुसरा दिवस होता.तलाठी सजांचंी व महसूल मंडळाची पुनर्रचना करणे, संगणकीकरण व ई-फेरफारमध्ये अडचणी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसूली या कामातून तलाठी संवर्गाला वगळणे, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पध्दतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यासाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना बंद करणे, अव्वल कारकून संवर्गातील पदे मंडळ अधिकारी वर्गातील कर्मचाऱ्यांमधून व मंडळ अधिकारी संवर्गातील पदे अव्वल कारकून संवर्गातून भरणे, मंडळ अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी बदलणे इत्यादी मागण्यासाठी राज्यभरातील तलाठी व मंडथळ अधिकारी सामूहिक रजेवर गेले आहेत़या मागण्यांसाठी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी यापूर्वीही काळया फिती लाऊन काम केले़तसेच जिल्हाअधिकारी कार्यालसमोर निदर्शने,धरणे आंदोलनही केले़ तरीही दखल न घेतल्यामुळे आम्हांंला संप पुकारावा लागला़ संपाला सुरुवात होऊन देखील आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले़ दरम्यानच्या काळात या संपामुळे विक्रमगड तालुक्यातील ९४ गाव पाडयांतील जनतेची कामे होत नसल्याने ती त्रस्त झाली आहे. तलाठी पटवारी व मंडळ अधिकारी यांचेशी रोजचीच कामे घेऊन येणाऱ्या सामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत़ विद्यार्थी वर्गास उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर, आधिवास, स्थानिक असे विविध दाखले, तलाठी जबाब पंचनामा आदि कामांसाठी तलाठयांची गरज भासते तर जमिनीबाबतची ७/१३ उतारा, फेरफार नोंद वगैरे सर्वच कामे बंद असल्याने सामान्य जनतेचे मोठे हाल होत आहेत. संप कधी संपणार याचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्याने जनता हताश झाली आहे. (वार्ताहर)
तलाठी व अधिकाऱ्यांच्या संपाने जनता झाली बेहाल
By admin | Published: November 18, 2016 2:07 AM