मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेसमधून (टिस) पीएच.डी करत असलेल्या विद्यार्थिनीचा फोटो वापरून मित्र, मैत्रिणींसोबत अश्लील चॅटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार ट्रॉम्बेमध्ये उघडकीस आला आहे. चार वर्षांपासून अनोळखी व्यक्ती त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचा फोटो वापरून संवाद साधत होता. तरुणीच्या तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस अधिक तपास करत आहेत.
मूळची गुजरातची रहिवासी असलेली तक्रारदार तरुणी टिसमध्ये पीएच.डीचे शिक्षण घेत असून, तेथीलच हॉस्टेलमध्ये राहते. जानेवारीमध्येच तिचा विवाह झाला. २०१० पासून ती फेसबुकचा वापर करते. त्यावर स्वत:सह कुटुंबीयांचे ती फोटो तिने अपलोड केले आहेत.
९ मे रोजी हॉस्टेलमध्ये असताना गुजरातवरून बहिणीच्या आलेल्या फोनमुळे हा प्रकार उघड झाला. गेल्या चार वर्षांपासून तिच्या फोटोचा वापर करून, हेली पटेल नावाची व्यक्ती फेसबुकवर संवाद साधत असल्याचे तिला समजले. त्या अकाउंटवर विद्यार्थिनीसह तिच्या बहिणीचे, आई-बाबांचे फोटोही अपलोड केले होते. २०१५ मध्ये अकाउंट सुरू केल्यानंतर तिच्या बहिणीचा फोटो ठेवला होता. त्यानंतर, त्यांच्या फेसबुकवर अपलोड करण्यात आलेल्या फोटोंचा यात वापर करण्यात आला. यात, अनेकांशी मैत्री करून त्यांच्यासोबत चॅटिंग करत असल्याने तिचा गोंधळच उडाला. अखेर, विद्यार्थिनीने ट्रॉम्बे पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.