राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्याची जामिनावर सुटका
पॉर्नोग्राफिक फिल्म प्रकरण :
राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्याची जामिनावर सुटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पॉर्नोग्राफिक फिल्मची निर्मिती करून त्यांचे ॲपद्वारे प्रसारण केल्याप्रकरणी दोन महिन्यापूर्वी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्प यांची ५० हजार रुपयांच्या मुचलक्यावर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी जामिनावर सुटका केली.
मुंबई पोलिसांनी काही दिवसापूर्वी पॉर्नोग्राफिक फिल्मप्रकरणी पुरवणी आरोपपत्र सादर केले होते. त्या आरोपपत्रात राज कुंद्रा याचे आरोपी म्हणून नाव आहे. त्यानंतर गेल्याच आठवड्यात राज कुंद्रा याने दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
आपल्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत. आपल्याला केवळ बळीचा बकरा बनविण्यात येत आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.
तसेच या प्रकरणात आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आपलीही जामिनावर सुटका करण्यात यावी, अशी विनंती कुंद्रा याने न्यायालयाला केली.
एफआयआरमध्ये नाव नसतानाही आपल्याला या प्रकरणात नाहक खेचण्यात आले आहे, असे कुंद्रा याने जामीन अर्जात म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जावर आक्षेप घेतला. कुंद्राची जामिनावर सुटका केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकेल तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
मात्र, न्यायालयाने कुंद्रा व त्याचा आयटी साथीदार रायन थोर्प यांची जामिनावर सुटका केली.