मुंबई : चुलत बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागात तिच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून तिच्याच भावाला अश्लील पोस्ट केल्याचा प्रकार घाटकोपर पोलिसांच्या चौकशीतून समोर आला. या प्रकरणी नेव्हल डॉकयार्डमध्ये लिपिक पदावर नोकरीवर असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेने दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर घरच्यांनी, नातेवाइकांनी संबंध तोडले. १ आॅक्टोबर रोजी त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावाचे फेसबुक अकाउंट उघडण्यात आले. त्यावर तक्रारदार महिलेसह त्यांच्या पती आणि मुलाचा फोटो ठेवण्यात आला.याच अकाउंटवरून त्यांच्या आत्येभावाला अश्लील संदेश पाठविण्यात आले. आत्येभावाकडून हा प्रकार समजताच तक्रारदार महिलेला चुलत बहिणीचा संशय आल्याने तिने तिच्याकडे चौकशी केली. मात्र तिने नकार दिला. अखेर महिलेने घाटकोपर पोलीस ठाण्यात ८ आॅक्टोबरला तक्रार दाखल केली.घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश काटकर यांच्या नेतृत्वाखाली, तेथील सायबर सेल प्रमुख पोलीस निरीक्षक विलास दातीर, तपासी अधिकारी दिलीप मयेकर, मोहन जगदाळे, अंमलदार शेट्ये, संतोष गीध, पाबळे, हरवळकर यांनी या प्रकरणी तपास सुरू केला.
सायबर सेलच्या मदतीने पोलिसांना आरोपी महिलेच्या मोबाइल क्रमांकावरून ते खाते उघडण्यात आल्याची माहिती मिळाली. अधिक चौकशी केली असता गुन्ह्याचे ठिकाणही तिचे घरच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांनी याबाबत आरोपी चुलत बहिणीकडे चौकशी सुरू केली. मात्र, आपण असा कुठलाही चुकीचा प्रकार केला नसल्याच्या मतावर ती ठाम होती.
पोलिसांनी तिच्या जवळच्या नातेवाईक, शेजारच्यांकडेही चौकशी केली. मात्र त्यातूनही काही निष्पन्न झाले नाही. त्यांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याने, मंगळवारी घाटकोपर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र, तक्रारदार विवाहितेच्या माहितीतून आंतरजातीय विवाहाच्या रागातूनच चुलत बहिणीने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.