चिमुरडीसोबत अश्लील चाळे
By admin | Published: February 9, 2015 01:58 AM2015-02-09T01:58:57+5:302015-02-09T01:58:57+5:30
बालवाडीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी स्कूलबसच्या कंडक्टरला कफपरेड पोलिसांनी अटक केली
मुंबई : बालवाडीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी स्कूलबसच्या कंडक्टरला कफपरेड पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात बलात्कार व बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रामप्रसाद असे या कंडक्टरचे नाव असून, त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत धाडण्यात आले आहे. पोलीस त्याच्या पार्श्वभूमीबाबत अधिक माहिती घेत आहेत.
गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईत राहणाऱ्या या चिमुरडीने रामप्रसादचे चाळे आपल्या आईला सांगितले. घाबरलेल्या आईने ही बाब आपल्या पतीच्या कानावर घातली आणि लागलीच चिमुरडीला नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी नेले. रुग्णालयातून ही बाब कफपरेड पोलिसांना समजली. मात्र पालक तक्रार करण्यास इच्छुक नव्हते. पोलिसांनी त्यांची समजूत घालून रामप्रसादविरोधात गुन्हा नोंदविला.
दुसरीकडे हा प्रकार समजताच शाळा प्रशासनाने तत्काळ रामप्रसादला कामावरून काढून टाकले. त्यानंतर तो कफपरेड परिसरातील गणेशमूर्तीनगर झोपडपट्टीतल्या घरी पोलिसांना सापडला. (प्रतिनिधी)