पोर्शे हिट अँड रनचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार! मृत मुलांच्या पालकांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 06:08 AM2024-06-25T06:08:33+5:302024-06-25T06:09:08+5:30
पुण्यात झालेल्या या घटनेनंतर यातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्युमुखी पडलेला तरुण अनिश अवधियाचे वडील ओमप्रकाश अवधिया आणि तरुणी अश्विनी कोष्टाचे वडील सुरेश कोष्टा यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सांत्वन केले. तसेच झालेली घटना दुर्दैवी असून दोषींना कठोरात कठोर शासन केले जाईल, असे सांगितले. या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून दोषींना लवकरात लवकर शासन व्हावे यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात झालेल्या या घटनेनंतर यातील दोषींवर कठोर कारवाई करून कुणालाही पाठीशी घालू नये, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. त्यानंतर या प्रकरणाचा वेगाने तपास होऊन अनेक जणांना अटक झाल्याचे या दोघांच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी मान्य केले. तसेच भेटून आपले म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल आणि आपल्या मुलांसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले.
विशेष बाब म्हणून प्रत्येकी १० लाखांची मदत
या घटनेतील अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली असताना देखील ही केस नव्याने उघडून त्यात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. या दोन्ही मृत मुलांच्या कुटुंबीयांना पुन्हा सावरता यावे यासाठी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये मदत देण्याचा निर्णयही मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.
बाल न्याय मंडळाकडून आज निकाल?
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी अर्ज का दाखल केला नाही, जामिनानंतरही मुलाला कैद करण्याचे कारण काय, मुलाला बालनिरीक्षण गृहातच बंदिस्त करण्यात आले आहे, हा बंदिवास नाही का, असे सवाल उपस्थित करून मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलासंदर्भात पुणे पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याबाबतचा निकाल बाल न्याय मंडळ मंगळवारी देणार आहे. मुलाचा जामीन रद्द केला जाणार, की त्याला नातेवाइकांच्या ताब्यात दिले जाणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.