Join us  

दिग्गज कलाकारांनी दिले ‘पोर्ट्रेट’चे धडे

By admin | Published: March 07, 2016 3:29 AM

ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, कलामित्र परिवार, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली वनविहार गार्डन येथे

मुंबई : ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, कलामित्र परिवार, पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप आणि बोरीवली सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली वनविहार गार्डन येथे ‘पोर्ट्रेट आर्टिस्ट्स ग्रुप’ची द्वितीय वार्षिक कला जत्रा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या वेळी झालेल्या स्पर्धेसाठी जवाहरलाल दर्डा फाउंडेशन पुरस्कृत अनेकांना पुरस्कार दिले होते. या स्पर्धेत पुण्याच्या स्नेहल पागे हिने ‘वासुदेव कामत ग्रँड प्राइझ’ पटकाविले. या पुरस्काराचे स्वरूप ७५ हजार आणि सन्मानचिन्ह असे आहे.हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, बनारसचे चित्रकार प्रा. प्रमाण सिंग आणि नवचित्रकार मनोज साकळे यांनी नवोदितांना व्यक्तिचित्रणाचे धडे दिले. या वेळी दुभती गाय, वासरू आणि गुराखी या मॉडेल्सचे प्रत्यक्ष पोर्ट्रेट्स रेखाटण्यात आले. ज्येष्ठ कलाकारांना पोर्ट्रेट रेखाटताना पाहून गार्डनच्या प्रांगणात कलारसिकांनी गर्दी केली होती. वासुदेव कामत यांनी जलरंगात, प्रा.प्रमाण सिंग यांनी सॉफ्ट पेस्टल्समध्ये आणि मनोज साकळे यांनी तैलरंगात व्यक्तिचित्र रेखाटले, तर या वेळी शिल्पकार चंद्रजित यादव यांनी शिल्पकृतीचे प्रात्यक्षिक दाखविले.गेल्या वर्षभरात फेसबुकच्या माध्यमातून द्विमासिक व्यक्तिचित्रण स्पर्धा घेण्यात आली. त्यातून अंतिम सहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. यात राजेश सावंत, अमित धाने, अजय देशपांडे, स्नेहल पागे, नानासाहेब येवले आणि अक्षय पै आदींचा समावेश होता. या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षय पै याने पटकाविला. जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे ५० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान अक्षयला प्रदान करण्यात आले, तर द्वितीय क्रमांक औरंगाबादच्या नानासाहेब येवले यांनी मिळविला. जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे २५ हजार रुपयांचे पारितोषिक नानासाहेब यांना देण्यात आले, तसेच उर्वरित राजेश सावंत, अमित धाने आणि अजय देशपांडे यांनाही जवाहरलाल दर्डा फाउंडेशनतर्फे प्रत्येक १५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले, तसेच कलाकारांना कोकुयो कॅम्लिनतर्फे भेट देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद बापट यांनी केले. (प्रतिनिधी)