पोलीस असल्याचे सांगून रिक्षात तरुणीला अटक; सुटकेसाठी मागितले ५० हजार,VIDEO सुरु करताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 03:56 PM2024-10-16T15:56:58+5:302024-10-16T16:09:22+5:30
मुंबईत पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या एका भामट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai Crime : महिलांसाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईत एका बनावट पोलीस अधिकाऱ्याने महिलेला रिक्षात घुसून अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. अटक टाळण्यासाठी बनावट पोलीस अधिकाऱ्याने महिलेकडे ५० रुपये देखील मागितले होते. मात्र महिलेने प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पीडित महिलेने ही घटना तिच्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केली होती. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतातील मोठ्या शहरांमध्ये खास करुन मुंबईमध्ये फसवणूक करणाऱ्यांची कमी नाही. नव्या नव्या कल्पनांनी भामटे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. मुंबईतही असाच एक प्रकार समोर आला आहे. एकाने पोलीस अधिकारी असल्याचे सांगून धावत्या रिक्षामध्ये एका महिलेकडून ई-सिगारेटसाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेने हा सगळा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये शूट करायला सुरुवात करताच त्या व्यक्तीने रिक्षामधून पळ काढला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पवईमध्ये भरदिवसा ही धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने भरदिवसा महिलेला ५० हजार रुपयांना लुटण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये आरोपी साध्या कपड्यात होता आणि महिला ई-सिगारेट म्हणजेच व्हेप पिताना दिसत होती. त्यानंतर त्या व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेला जबरदस्तीने ताब्यात घेतले. यावेळी त्या व्यक्तीने महिलेला रिक्षात बसवून ठेवत अटक टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने त्या व्यक्तीचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली ज्यानंतर ती व्यक्ती खूप घाबरली आणि रिक्षातून खाली उतरली.
पैसे न दिल्यास पवई पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली होती. काही तरी गडबड असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने फोनवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये 'मी सध्या एमआयडीसी रोडवर आहे आणि हा माणूस माझ्या मागे येत आहे आणि ऑटो रिक्षात बसून मला जबरदस्तीने पवई चौकीकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे', असे महिला व्हिडीओमध्ये बोलताना ऐकू येत आहे. 'महिला पोलिसांशिवाय तुम्ही मला कुठेही नेऊ शकत नाही, असेही पीडिता म्हणाली. यानंतर ती व्यक्ती रिक्षातून उतरी आणि पळून गेली.
Encounter with a Suspicious Cop Over a Vape in Mumbai. Asked 50k to let go.@MumbaiPolice please look into this incident.#fraud#femalesecuritypic.twitter.com/gitNVPCngU
— मराठा 🚩 (@Mard_Maratha_0) October 15, 2024
दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ऑटो-रिक्षात बसून पोलीस असल्याचे सांगणार्या व्यक्तीने स्वतः ई-सिगारेट पिण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्संनी त्या व्यक्तीला न थांबवल्याबद्दल ऑटो चालकाला फटकारले. त्याचबरोबर अनेकांनी मुंबई पोलिसांना टॅग करून फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.