डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे केली कोरोनावर मात, परळमधील लोखंडे कुटुंबीयांशी ‘लोकमत’चा संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 08:54 AM2021-05-10T08:54:12+5:302021-05-10T08:54:47+5:30
पेशाने इंजिनिअर असलेल्या वैभव लोखंडे आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली. लक्षणे तीव्र असल्याने केईएम रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला. परंतु, इतक्या स्फोटक स्थितीत तिथे सुविधा मिळतील की नाही, याबाबत मनात शंका होती.
मुंबई : कोरोना शरीरासोबत मनावरही नकारात्मक परिणाम करतो. ज्या रुग्णाने या नकारात्मकेवर विजय मिळवला, तोच कोरोनारुपी संकटातून मुक्त होऊ शकतो. डॉक्टर रुग्णांच्या मनात सकारात्मक विचार पेरून त्यांना याविरोधात लढण्यासाठी बळ देतात. आम्हीसुद्धा सकारात्मक ऊर्जेमुळेच कोरोनावर मात करू शकलो, असे मत परळमधील लोखंडे कुटुंबीयांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पेशाने इंजिनिअर असलेल्या वैभव लोखंडे आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली. लक्षणे तीव्र असल्याने केईएम रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला. परंतु, इतक्या स्फोटक स्थितीत तिथे सुविधा मिळतील की नाही, याबाबत मनात शंका होती. दुसरा कोणताच पर्याय समोर नसल्याने केईएममध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. पण तिथे पालिकेने उभारलेल्या यंत्रणा पाहूनच आमच्या मनातील शंका दूर झाल्या, असे वैभव यांनी सांगितले. आम्ही केईएममध्ये ११ दिवस राहिलो. या काळात पालिकेच्या यंत्रणेने मनापासून सेवा केली. रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा, यासाठी प्रत्येकजण झटत होता. त्यासाठी नियोजनपूर्वक कामाची आखणी करण्यात आली होती. रुग्णांना जेवण आणि औषधे देण्यात दिरंगाई केली जात नव्हती. वेळोवेळी साफसफाई होत असल्याने रुग्णालय असूनही वातावरण प्रसन्न होते. वरिष्ठ डॉक्टर प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. रुग्णाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम ते करीत. ‘तू चुटकीसरशी बरा होशील’, ‘तुला औषधींची काय गरज’, अशा प्रकारे धीर दिल्याने मनोबल वाढत होते. पालिकेच्या डॉक्टरांनी दिलेल्या सकारात्मक ऊर्जेमुळेच आम्ही कोरोनावर मात करू शकलो, हे आवर्जून नमूद करू इच्छितो, असे वैभवने सांगितले.
विनाकारण फिरणाऱ्यांना आवाहन
कोरोनाची स्थिती दिवसागणिक स्फोटक होत चालली आहे. जे लोक विनाकारण फिरतात, त्यांना लागण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. नशिबाने तुम्ही अद्याप मोकळा श्वास घेऊ शकत आहात. ज्यावेळी कृत्रिम ऑक्सिजन घेण्याची वेळ येईल, तेव्हा चूक लक्षात येईल. त्यामुळे भानावर या, असे आवाहन लोखंडे कुटुंबीयांनी केले.
घरातील अन्य व्यक्तींनी कशी काळजी घेतली?
घरातील इतर सर्वजण १४ दिवस विलगीकरणात राहिले. आमच्यामुळे इतर कोणालाही संसर्ग होऊ नये, हा त्यामागील उद्देश होता. याकाळात शेजारी आणि सोसायटीतील सदस्यांनी खूप मदत केली. बाजारातून सामान आणून देण्यापासून ते अन्य आवश्यक गरजांची पूर्तता त्यांनी केली. त्याचे पैसे शेवटपर्यंत मागितले नाहीत. पण, आम्ही कोरोनातून बरे झाल्यानंतर पैसे परत केले, असे लोखंडे कुटुंबीयांनी सांगितले.