मुंबई विमानतळावरील प्रकार; पालिका रुग्णालयाच्या तपासणीत कोरोना झालाच नसल्याचे उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विमानतळावरील कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघालेल्या प्रवाशाचा अहवाल अवघ्या सात तासांत निगेटिव्ह आला. महापालिकेच्या रुग्णालयात केलेल्या पुनर्तपासणीत संबंधित प्रवाशाला कोरोना झालाच नसल्याचे उघडकीस आले आहे.
शबिस्ता आकलेकर असे या महिला प्रवाशाचे नाव असून, त्या ९ मे रोजी मुंबईहून बहरीनला जात होत्या. त्यांच्याकडे असलेल्या कोरोना अहवालाची मुदत विमान उड्डाणाच्या १० मिनिटांआधी संपणार असल्याने त्यांना पुन्हा चाचणी करावी लागेल अन्यथा प्रवासाला परवानगी मिळणार नसल्याचे संबंधित विमान कंपनीने सांगितले. त्यांनी विमानतळावर कोरोना चाचणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली.
हा प्रकार काॅंग्रेस नगरसेवक सुफियान वनू यांना कळताच त्यांनी विमानतळ गाठत विलगीकरण नियमावलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि संबंधित महिला प्रवाशाला घेऊन पालिकेचे रुग्णालय (एफ उत्तर विभाग) गाठले. तेथे पुनर्तपासणी केली असता, संबंधित महिलेचा अहवाल निगेटिव्ह आला. सकाळी ८.१० वाजता पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती दुपारी तीन वाजता निगेटिव्ह कशी काय येऊ शकते, असा प्रश्न वनू यांनी केला. पालिकेचे अधिकारी विलगीकरणाची सक्ती करून हॉटेल मालकांची दलाली करत असून, लॅबमालकांशी संधान साधल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री, महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
* पालिकेचा संबंध नाही!
पालिकेशी या प्रयोगशाळेचा काहीही संबंध नाही. विमानतळ प्राधिकरणाने त्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित महिला प्रवाशाने तेथे चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी दिलेला पत्ता रत्नागिरीतील होता. त्यामुळे नियमाप्रमाणे त्यांना कुठे विलगीकरणात राहायचे आहे, याबद्दल विचारणा केली. काही खासगी हॉटेल आणि पालिकेच्या विलगीकरण सुविधांविषयी माहिती दिली. मात्र, त्या महिलेने पालिकेच्या वॉर रुमला फोन केला. तेथील डॉक्टरांनी त्यांना जेनेसिस या हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. तेथे पालिकेने गरजू प्रवाशांची मोफत व्यवस्था केली आहे. त्या तेथे दाखल झाल्यानंतर संबंधित नगरसेवक त्यांना तपासणीसाठी घेऊन गेल्याचे कळते, असे पालिकेचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी सांगितले.
* दाेषींवर हाेणार कारवाई
कोरोनाचे निदान झालेल्या व्यक्तीला तातडीने विलगीकरणात पाठवणे हा शासनाचा नियम आहे. संबंधित प्रवाशाला विलगीकरणात ठेवण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना केल्या, या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाला पत्राद्वारे विचारणा केली आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर जे या प्रकरणात दोषी आढळतील, त्या सर्वांवर कारवाई केली जाईल.
-पराग मसुरकर,
सहाय्यक आयुक्त, मुंबई महानगर पालिका.
...............................................