लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधायकतेची जोड देत सकारात्मक पत्रकारिता करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी साेमवारी मालाड येथील जनसेवा समिती संचालित श्री. एम. डी. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सद्वारा आयोजित वेबिनारमध्ये मार्गदर्शन करताना केले.
‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे’च्या निमित्ताने ‘पत्रकारिता : काल, आज आणि उद्या’ या विषयावर ‘झूम’च्या माध्यमातून आयोजित वेबिनारमध्ये योगेश त्रिवेदी आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. धर्मेश भट्ट यांना श्री. एम. डी. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मालाड, मुंबई या महाविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ मास मीडियातर्फे विशेष व्याख्याते म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी त्रिवेदी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारितेची सुरुवात कशी झाली, याचा उहापोह करताना सांगितले की, भारतात १७८० साली जेम्स ऑगस्ट्स हिक्की या इंग्रज पत्रकाराने ‘कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर’ या वर्तमानपत्राद्वारे पत्रकारितेची सुरुवात केली. ३० मे १८२६ रोजी पंडित जुगलकिशोर शुक्ल यांनी ‘उदन्त मार्तंड’ हे हिंदी वृत्तपत्र सुरू केले तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ नावाचे मराठी वर्तमानपत्र सुरू केले. हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
पूर्वी पत्रकारिता एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत होती. नंतर या माध्यमाचा विस्तार होताना आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश झाला. लिथो, हँड कंपोझिंग, मोनो, ऑफसेट करताकरता डिजिटल माध्यम आले. पत्रकारिता दुधारी शस्त्र असून, त्याचा जबाबदारीने उपयोग केला पाहिजे. समाजाची बांधिलकी समजून पत्रकारिता केली पाहिजे, असे सांगताना त्रिवेदी यांनी अनेक अनुभव सांगितले. समाजमाध्यमातून काम करताना अफवा पसरणार नाहीत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या संदर्भात काही उदाहरणेही दिली.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. धर्मेश भट्ट यांनी पत्रकारितेची आजपर्यंतची वाटचाल सोप्या शब्दांत समजावून सांगताना यातील विविध खाचखळगे आणि धोकेही समजावून सांगितले.
‘मास मीडिया’च्या अनेक विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रकारच्या प्रश्नांना त्रिवेदी यांनी योग्य उत्तरे देत मार्गदर्शन केले. यावेळी थेट आंध्र प्रदेशातूनही विद्यार्थिनींनी प्रश्न विचारले.
प्रारंभी गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत कोरोनाने दिवंगत झालेल्या पत्रकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दीपा शर्मा यांनी व्याख्यात्यांचे आणि सर्वांचे स्वागत केले. बीएएमएमच्या ऑर्डिनेटर डॉ. प्रीती जैन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रोशनी जाधव यांनी स्वागतपर गीत गायले. संगीता जैन यांनी व्याख्यात्यांचा परिचय करुन दिला तर मानसी घुले यांनी आभार मानले.
------------------- ----------------------------